व्यवसाय वृद्धीकरिता डेटाआधारित अंदाजांची भूमिका महत्वपूर्ण
प्रत्येक व्यवसाय शाश्वत वाढ साध्य करण्यास व नवीन उंची गाठण्यास उत्सुक असतो. डिजिटल प्रगतीच्या या युगात डेटा हे, व्यवसायांपुढील वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी, निर्णायक बलस्थान आहे. डेटाच्या मदतीने, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा मशिन लर्निंग यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांचे उपयोजन करून, कंपन्या अचूक व माहितीपूर्ण निर्णय करू शकतात.
डेटावर आधारित धोरणांचा अवलंब करणारे व्यवसाय आव्हानांवर मात करण्यास सक्षम होत आहेत आणि प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे जाण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त होत आहे. फॉरेस्टरच्या मते डेटा-ड्रिव्हन कंपन्या दरवर्षी ३० टक्क्याच्या सरासरीने वाढ साध्य करत आहेत आणि प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत सातत्याने सरस ठरत आहेत. व्यवसायांना वाढीच्या आव्हानांवर मात करून भरभराट साधण्यात डेटाची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे एंजेल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी सांगतात.
डेटा अंदाज खर्च कमी करण्यासाठी उपयुक्त: बिग डेटा अॅनालिटिक्स मौल्यवान माहिती पुरवते. ही माहिती कंपन्यांना कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच खर्च कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. डेटाच्या प्रभावी वापराच्या सर्वांत महत्त्वपूर्ण लाभांपैकी एक म्हणजे मार्केटिंग व अन्य उपक्रमांचा खर्च कमी करण्याचे सामर्थ्य होय. डेटातून प्राप्त झालेल्या माहितीमुळे व्यवसायांना अधिक लक्ष्याधारित व पर्सनलाइझ्ड अभियाने राबवण्यात मदत होते. बिग डेटाचा लाभ घेऊन, कंपन्या कार्यात्मक खर्च कमी करू शकतात व उत्पन्न वाढवू शकतात. बीएआरसी संशोधनानुसार बिग डेटाचा वापर करणाऱ्या कंपन्यांचा नफा ८ टक्क्यांनी वाढला आहे, तर खर्च १० टक्क्यांनी कमी झाला आहे.
बिग डेटा अंदाजांमुळे विक्री वाढवण्यात मदत: बिग डेटा अॅनालिटिक्सचा वापर करून कंपन्या त्यांची विक्री वाढवू शकतात. विक्री वाढवणे हे तर जगभरातील व्यवसायांच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक असते. कंपन्यांकडे आपले लक्ष्य ग्राहक व त्यांच्या गरजा जाणून घेण्यासाठी पुरेशी माहिती नसते, तेव्हा आव्हाने उभी राहतात. विक्री केपीआयचा जास्तीत-जास्त लाभ घेऊन व्यवसाय चातुर्याने पावले उचलू शकतात. विक्रीविषयक डेटाचा अभ्यास करून तसेच आपली धोरणे त्यासोबत जोडून कंपन्या अधिक चांगली ग्राहक माहिती जमवू शकतात. अधिकाधिक विक्री डेटाचे विश्लेषण केल्यास कंपन्यांना अधिक माहिती मिळते आणि त्याद्वारे महत्त्वाच्या मुद्दयांचे वर्गीकरण शक्य होते. विक्री डेटाचे विश्लेषण करण्यासाठी साधनांचा व्यवस्थित वापर केल्यास माहिती वेगाने उपलब्ध होऊ शकते. कंपन्या डेटा अॅनालिटिक्सच्या आधारे प्रक्रिया स्वयंचलित करू शकतात व विक्रीला बढावा देऊ शकतात.
डेटाविषयक अंदाजांमुळे नवीन ग्राहक संपादन करण्यात तसेच आधीचे ग्राहक टिकवून ठेवण्यात मदत होते: एका अहवालानुसार उद्योगक्षेत्रातील एक तृतीयांश व्यावसायिकांच्या मते, डेटावर आधारित पद्धती या ग्राहक समजून घेण्यासाठी व निर्णय करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. मॅककिन्सेच्या मते, ७१ टक्के ग्राहक कंपन्यांकडून व्यक्तीनुरूप अनुभवाची अपेक्षा ठेवतात आणि हा अनुभव आवडला नाही, तर तीन चतुर्थांश ग्राहक दुसऱ्या पर्यायाकडे वळतात. सखोल माहिती प्राप्त करून अधिक चांगल्या सेवा देण्याच्या माध्यमातून ग्राहक संपादन करण्यात आणि आधीचे ग्राहक टिकवून ठेवण्यात डेटा महत्त्वाची भूमिका बजावतो.
डेटा-ड्रिव्हन कंपन्यांमध्ये नवीन ग्राहक संपादन करण्याची संभाव्यता २३ पटींनी अधिक असते, ग्राहक टिकवण्याची संभाव्यता ६ पटींनी अधिक असते, तर नफा कमावण्याची संभाव्यता १९ पटींनी अधिक असते. आपल्या ग्राहकांना काय हवे आहे हे समजून घेण्यात व्यवसायांना अपयश आले आणि त्यांनी निकृष्ट दर्जाची सेवा व उत्पादने दिली, तर त्यांच्यापुढे आव्हाने उभी राहतात आणि वाढ खुंटते. बिग डेटा ग्राहक नमुने व प्रवाहांचे निरीक्षण करण्यात उपयुक्त ठरतो आणि कंपनी जेवढा अधिक डेटा जमवेल, तेवढी अधिक मौल्यवान माहिती नमुने व प्रवाहांविषयी मिळते. अनेक ठिकाणी बिग डेटा अॅनालिसिस धोरण ग्राहकांच्या वर्तन नमुन्यांबाबत तपशील पुरवते आणि ग्राहकांना काय हवे आहे ते देण्यात मदत करते. उदाहरणार्थ, नेटफ्लिक्सला ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी करावा लागणारा खर्च बिग डेटामुळे दरवर्षी १ अब्ज डॉलर्सनी कमी झाला.
नवोन्मेष व उत्पादन विकासाला चालना देण्यासाठी डेटा अंदाज: शिकागो अॅनालिटिक्स ग्रुपच्या मते, नवोन्मेषाचे चक्र २५ टक्के अधिक वेगाने चालवण्यासाठी डेटा अॅनालिटिक्स उपयुक्त ठरते. डेटाचा प्रभावी वापर केल्यास नवोन्मेष व नवीन उत्पादने विकसित करणे आव्हानात्मक राहत नाही. विशाल डेटा संग्रहित करून, व्यवसाय अधिक महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त करू शकतात आणि त्याद्वारे ग्राहकांच्या गरजांनुसार नवीन उत्पादने डिझाइन करण्याची मुभा मिळते. बिग डेटा अॅनालिटिक्सच्या मदतीने कंपन्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या विविध उपक्रमांचा माग ठेवू शकतात, उत्पादनांचे परीक्षण करू शकतात आणि असे खूप काही करू शकतात. बिग डेटाचा वापर करून नवोन्मेषाला चालना देत असल्याचा दावा ६४.२ टक्के व्यवसायांनी केला आहे. म्हणजेच बिग डेटाची जोपासना करून कंपन्या त्यांच्या ग्राहकांच्या बदलत्या मागण्या पूर्ण करणारी नवीन उत्पादने नवोन्मेषाने घडवू शकतात आणि ग्राहकांची संख्या वाढवू शकतात.
या डिजिटल युगात वित्तीय फर्म्सच्या यशाची नवोन्मेष ही गुरूकिल्ली आहे. बिग डेटामुळे सखोल व निर्णायक माहिती मिळते आणि त्याद्वारे नवोन्मेष साध्य करण्यात मदत होते. या डेटातून मिळणाऱ्या माहितीमुळे प्रवाह, ग्राहक वर्तन व गरजा यांबद्दल अधिक समज प्राप्त होते. त्यामुळे फर्म्स नवीन उत्पादने व सेवा यांबद्दल माहितीपूर्ण निर्णय करू शकतात.
फसवणूक आणि पूर्तता: वित्तीय फर्म्ससाठी सुरक्षितता हा घटक अत्यावश्यक आहे, कारण त्या दररोज विस्तृत डेटाचे व्यवहार करतात. त्यांचा संवेदनशील व गोपनीय डेटा संरक्षित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी वेगवेगळे व्यवहारात्मक डेटासंच व ग्राहक वर्तनासारखी अतिरिक्त माहिती आवश्यक असते. बिग डेटाच्या मदतीने कंपन्या, फसवणुकीचे नमुने दर्शवणारा महाकाय डेटा जमवू शकतात आणि आवश्यक ती पावले उचलू शकतात.
सारांश: डेटाचा उपयोग करणाऱ्या कंपन्यांना त्याचे अविश्वसनीय लाभ मिळत आहेत. आव्हानांवर प्रभावीपणे मात करून व्यवसाय वाढवण्यात डेटा संप्रेरकाचे काम करतो. अचूक डेटा अंदाजांमुळे कंपन्यांना आता माहितीपूर्ण निर्णय करणे शक्य होते, अदमासांवर अवलंबून राहावे लागत नाही.