माझ्या आठवणीतील टिहिरी
ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ सुंदरलाल बहुगुणा यांचे महानिर्वाण झाल्याची बातमी ऐकली व मन एकदम टिहिरी परिसरात पोहोचले. २००५ मधील तेथे दिलेल्या भेटीचे हे अनुभवकथन…
डॉ. निलिमा राजगुरू
२००५चा डिसेंबर महिना. आम्ही बद्रीनाथला निघालो होतो. खरेतर आमची ही ट्रिप दिवाळी सुट्टीत ठरवली होती. पण काही अपरिहार्य कारणाने आम्ही तेव्हा जाऊ शकलो नाही. म्हणून डिसेंबरला आम्ही ठरल्याप्रमाणे आधी हरिद्वार मग डेहराडून-मसुरीला गेलो. माझे पती, मुलगा, मी, सासूबाई व माझी आई असे हम पांच होतो. तसा ऑफ सीझन चालू झाला होता.
मसुरीहून बद्रीनाथला जायचा नेहमीचा रस्ता हृषिकेश वरून जातो. त्यासाठी मसुरी वरून परत घाट उतरून खाली जावे लागणार होते. म्हणून ड्रायव्हरने विचारले आपण जरा वेगळ्या रस्ताने जाऊ या का? स्थानिक रहिवासी हा रस्ता वापरतात. आम्ही उत्साहाने होकार दिला. मग मसुरी वरून आम्ही पुढे निघालो. प्रथम एक धानोल्ती म्हणून अप्रतिम सुंदर गाव लागले. तिथे आदल्या रात्री बर्फ पडले होते. रस्त्यात थांबून बर्फात खूप खेळलो. गर्दी काहीच नाही फक्त आम्ही व स्थानिक लोकांच्या ये-जा असलेल्या पीक अप टॅक्सी. त्यापण तुरळक. घाटात काही ठिकाणी रस्त्यावर खूपच बर्फ होते. पण ड्रायव्हर ने मोठ्या कौशल्याने त्यातून गाडी काढली. बर्फावर गाडी खूप घसरते. आम्ही तर जीव मुठीत धरून बसलो होतो.
निर्जन रस्ता, सर्वत्र बर्फ, एका बाजूला उत्तुंग पहाड तर दुसऱ्या बाजूला नजर पोहोचणार नाही इतकी खोल दरी. बरं त्या रस्त्यांना कठडे वगैरे काही नाही. गाडी घसरली तर सरळ दरीतच. पण तो टप्पा पार केला. पुढे आम्हाला मुक्कामाला श्रीनगर नावाच्या गावाला पोहोचायचे होते. निसर्ग सौंदर्य पाहत पाहत चाललो होतो. ड्रायव्हर म्हणाला आता आपल्याला टिहिरी गाव लागेल. थोड्या वेळाने पाहतो तो काय रस्ता एकदम संपलेला व पुढे नजरेसमोर एक विस्तीर्ण जलाशय पसरलेला.
ड्रायव्हरला पण काही उमजेना की काय झाले आहे. तो म्हणाला मी पण खूप दिवसांनी आलो आहे इकडे. बरं तिथे चौकशी करावी तर कोणीच नव्हते. दूर पाण्यात एक मनोरा आणि काही घरांची छपरे दिसत होती. त्याने गाडी परत मागे घेतली व आम्ही बरेच मागे आलो. त्यावेळी एका वळणावर नया टिहिरी अशी पाटी दिसली. थोडे पुढे गेल्यावर दोन-चार घरे पण दिसली. मग ड्रायव्हरने खाली उतरून त्या लोकांकडे चौकशी केली. रस्ता विचारला. मग कळले की, टिहिरी धरणाचे काम चालू आहे. आणि ते मूळ टिहिरी गाव पाण्याखाली गेले आहे.
सर्व वस्ती या नया टिहिरीत स्थलांतरित झाली आहे. लांब जो मनोरा दिसत होता, वो गिरिजाघर है, असे त्या लोकांनी सांगितले. असे पाण्याखाली गेलेले गाव आम्ही प्रथमच बघत होतो. ते दृश्य पाहून मन एकदम हेलावून गेले. टिहिरी धरण, त्याला असलेला स्थानिकांचा विरोध, सुंदरलाल बहगुणा यांनी केलेले आंदोलन याविषयी वर्तमान पत्रात वाचले होते. पण ते असे अचानक प्रत्यक्ष बघायला मिळेल, असे कधीही वाटले नव्हते.
नवे टिहिरी गाव रस्त्याच्या कडेला वसले आहे. एकसारखी पिवळा रंग दिलेली घरे! ती पण उदास वाटत होती. घाट चढून गेल्यावर माथ्यावर गाडी थांबून आम्ही खाली पाहिले तर खोल दरीत धरणाची अजस्त्र भिंत, व पलीकडे पाण्यात बुडालेले गाव दिसत होते. काही अर्धवट बुडालेली घरे. तो मनोरा पण दिसत होता. जसे पाणी वाढेल तसे सगळे पाण्याखाली जाणार होते. मनात संमिश्र भावना दाटून आल्या होत्या. पिढ्यानपिढ्या राहिलेले गाव एकीकडे पाण्यात होते. धरण झाल्याने होणारे फायदे एकीकडे होते. पण मला व्यक्तिशः गाव पाण्यात गेल्याचे खूपच वाईट वाटत होते. मलाच इतके वाईट वाटत होते तर वर नव्या गावात वसलेल्यांना खाली बघून काय वाटत असेल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते.
नंतरचा आमचा प्रवास त्या धरणाच्या बांधकामा सोबतीनेच झाला. धरणाची अजस्त्र भिंतही जवळून बघितली. ते सर्व बघताना असेच वाटले की हा सर्व अट्टाहास कशाला? का इथे आपण ही धरणे बांधली? आधीच गढवाल भागातले पर्वत ठिसूळ. त्यात हा दबाव शिवाय नदीप्रवाह अडवल्याने होणारे दुष्परिणाम वेगळेच. मी काही त्यातील तज्ञ नाही पण मला प्रत्यक्ष बघून जे वाटले त्यावरून मी माझे मत मांडले. असो आज चिपको आंदोलन कर्ते सुंदरलाल बहुगुणा गेले ही बातमी कळल्याने माझ्या त्या आठवणी जाग्या झाल्या.