आता सर्वांसाठी Google Workspace सुविधा
– अशोक पानवलकर
आज जीमेलचा वापर जवळपास तीन अब्ज लोक करतात. जीमेलशिवाय Microsoft Outlook आणि याहू मेल हेही मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. जीमेलचे दोन भाग आहेत. एक, तुमच्या-माझ्यासाठी साधे जीमेल. दुसऱ्या Google Workspace अंतर्गत येणाऱ्या अतिरिक्त सेवांसह मिळणाऱ्या गुगलच्या सुविधा. या Google Workspace ला आधी G Suite असे नाव होते. ज्यांना व्यावसायिक कारणासाठी जीमेल व संबंधित सेवांचा वापर करायचा आहे ते Google Workspace वापरतात. यात त्यांना जीमेलसह documents, Chat, Google Drive , Google Calendar वगैरे सेवा अधिक क्षमतेने व प्रभावीपणे वापरता येतात. आता गुगलने ही दरी दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी जीमेल वापरत असणाऱ्या प्रत्येकासाठी Google Workspace उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
तुमच्या जीमेलवर हे activate करून घेतलेत की तुम्हाला या अतिरिक्त सेवांचा लाभ घेता येईल. स्मार्ट बुकिंग सेवा, व्यावसायिक विडिओ मिटींग्स, इमेल मार्केटिंग वगैरे उपलब्ध होईल. हे activate करण्याची पद्धत अगदीच सोपी आहे. तुमचे जीमेल ओपन करा. मग Settings ओपन करा. मग See All Settings वर क्लिक करा. नंतर Chat and Meet वर क्लिक करा. तिथे Hangouts ऐवजी google Chat निवडा. नंतर खाली Manage Chat Settings वर क्लिक करा. तुमच्या पसंतीचे पर्याय निवडा. झाल्यावर Done वर क्लिक करा आणि शेवटी Save Changes वर क्लिक करा. आता तुम्ही Google Workspace चा वापर करू शकाल. तुम्हाला जीमेलमध्ये Chat , Rooms आणि Meet या तीनही सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.
याहीपेक्षा अधिक व्यावसायिक सेवा हव्या असल्यास तुम्ही पैसे भरून घेऊ शकता. महिना १२५ रुपये भरल्यास तुम्हाला १०० जणांच्या विडिओ मिटींग्स आणि ३० जीबी डेटा मिळेल. आधी महिना २१० रुपये द्यावे लागत होते. महिना ६७२ रुपये देण्याची तयारी असली तर तुम्हाला १५० लोकांच्या विडिओ मिटींग्स त्याच्या रेकॉर्डिंग्सह घेता येतील शिवाय दोन टीबी (२००० जीबी) डेटा मिळेल. पूर्वी यासाठी ८४० रुपये द्यावे लागत होते. महिना १२६० रुपये देण्याची तयारी असेल तर २५० लोकांच्या विडिओ मिटींग्स, रेकॉर्डिंग, Attendence Tracking आणि पाच टीबी (५००० जीबी) डेटा मिळेल.
तुमची व्यावसायिक गरज नसली तर गुगलने आता उपलब्ध करून दिलेले Google Workspace अगदी पुरेसे आहे. काय करायचे ते तुम्ही ठरवा.