इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोनामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. काहींची नोकरी अर्धवेळ झाली तर काहींच्या पगारात लक्षणीय कपात झाली. कोरोना निर्बंध हटताच पुन्हा जोशाने सर्वत्र काम सुरू झाले आहे. सहाजिकच कोरोना काळातील वर्क फ्रॉम होम सुद्धा आता बंद करण्याच येत आहे. अशातच एका कंपनीतील तब्बल ८०० जणांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. ही कंपनी म्हणजे व्हाईट हॅट ज्युनिअर ही आहे.
कंपनीने वर्क फ्रॉम होम बंद केल्याने त्याचा राग कर्मचाऱ्यांना आला आहे. कार्यालयात येऊन काम करण्याची कर्मचाऱ्यांची इच्छा नाही. त्यामुळेच कंपनीत धडाधड राजीनामासत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. कंपनीने वर्क फ्रॉम होम बंद करण्याची घोषणा १८ मार्च रोजी केली. सर्व कर्मचाऱ्यांनी १८ एप्रिलपर्यंत (महिन्याभराच्या आत) कंपनीत कामावर रुजू व्हावे, असे निर्देश दिले. मात्र, कंपनीच्या या धोरणाला कर्मचाऱ्यांनी विरोध केला आणि आपले राजीनामे सादर केले. आतापर्यंत कंपनीतील एकूण ८०० जणांनी सोडचिठ्ठी दिली आहे. तर, यापुढील काळात आणखी कर्मचारी कंपनी सोडण्याच्या तयारीत असल्याचे मनी कंट्रोलने म्हटले आहे.
अवघ्या महिनाभरात कंपनीत कामाला जाणे हे तसे अवघड आहे. कौटुंबिक आणि अन्य अनेक प्रश्न असल्याने ही बाब शक्य नाही. वर्क फ्रॉम होमला आमचे अधिक प्राधान्य असल्याचे राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्य़ांचे म्हणणे आहे. तर, काहींचं मत आहे की, फारशी पगारवाढ न होता आता कंपनीत कामाला जाणे परवडणारे नाही. त्यामुळे राजीनामा देऊन अन्य कंपनीत जाणे पसंत केले.
https://twitter.com/Venkyy___/status/1524373074484682752?s=20&t=_GxWSJ4M2Ul0uNe_QPH9MA