नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र- २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी २०२१ सत्रातील परीक्षा राज्यातील विविध १७७ परीक्षा केद्रांवर घेण्यात येत आहेत. प्रथम वर्ष, व्दितीय वर्ष, तृतीय वर्ष विविध विद्याशाखांचे पदवीच्या विद्यार्थ्यांचे १२ ते ३० ऑक्टोबर २०२१ दरम्यान घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. १२ ऑक्टोबर २०२१ रोजी होमिओपॅथी विद्याशाखेचे प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षाची प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आला आहे. तथापी इतर अभ्यासक्रमांची परीक्षा संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार नुसार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या मान्यतेच्या अभावी परीक्षेस बसू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पात्रतेसाठी उद्या दि. १३ ऑक्टोबर रोजी प्रवेश नियामक प्राधिकरणाची मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या प्रशासकीय कारणास्तव आजची होमिओपॅथी विद्याशाखेच्या परीक्षेत बदल करण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले. सदर परीक्षेच्या वेळापत्रकातील बदलाबाबत माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना सूचित करणेबाबत कार्यवाही करावी असे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.