नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सैन्यदलात गेल्या अडीच वर्षांपासून सैन्यभरती बंद आहे. परंतु टूर ऑफ द ड्यूटी (टीओडी) च्या माध्यमातून तरुणांना चार वर्षांच्या करारावर लष्करात भरती करण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली आहे. लष्कराशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार सैन्यदलात होणाऱ्या भरतीसाठी टीओडी हा पर्याय नाही. ही प्रक्रिया सामान्य भरतीप्रक्रियेच्या समांतर चालणार आहे. याच्या माध्यमातून तरुणांना सैन्यदलात चार वर्षे काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
टूर ऑफ द ड्यूटी ही परदेशातील जुनी प्रचलित पद्धत आहे. यामध्ये काही काळासाठी तरुणांना सैन्यदलात भरती केले जाते. त्यांना प्रशिक्षणही दिले जाते. एका निश्चित काळानंतर त्यांना हटविले जाते. सामान्य भरतीप्रक्रियेदरम्यान टीओडीमध्ये सेवा दिलेल्या उमेदवारांसाठी जागा आरक्षित केल्या जातात. अशाच प्रकारचा आराखडा भारतीय लष्करभरतीमध्येसुद्धा तयार केला जात आहे. सैन्याची आवश्यकता खूपच मर्यादित स्वरूपाची असलेल्या देशांमध्ये ही व्यवस्था यशस्वी ठरली आहे.
लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, चार वर्षांचासाठीच्या टीओडीच्या प्रस्तावावर अनेक पातळींवर चर्चा सुरू आहे. परंतु अंतिम निर्णय झालेला नाही. सामान्य लष्कर भरतीप्रक्रियेऐवजी टीओडीच्या माध्यामातून भरती होईल, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. टीओडी व्यवस्था लागू झाली तरी सामान्य भरतीप्रक्रिया सुरूच राहणार आहे.
टीओडीच्या माध्यमातून लष्करात पात्र उमेदवारांची कमतरता दूर करण्याचा उद्देश आहेत. शिवाय देशात आवश्यकता भासल्यास सैन्य प्रशिक्षण प्राप्त जवानांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचाही हेतू आहे. परंतु यामध्ये अनेक अडथळेसुद्धा आहेत. सामान्यपणे लष्करात करिअर करण्यासाठी तरुण भरती होतात. लष्करातील सेवानिवृत्तीचे वय वाढवावे अशी मागणी सध्या केली जात आहे. ३८-३९ व्या वर्षी जवान सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना दुसरे काम शोधावे लागते. त्यामुळे चार वर्षांसाठी सैन्यदलात कोण भरतीसाठी येईल हे सांगणे कठीण आहे. या सर्व पैलूंवर विचार सुरू आहे.
कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर लष्करात जवानांची भरती होऊ शकली नाही. सध्या जवानांचे सव्वा लाख पदे रिक्त असल्याचा अंदाज आहे. सामान्य भरतीप्रक्रिया सुरू करण्याबाबत सध्या कोणतीच अधिकृत माहिती उपलब्ध नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.