इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. बडगाम आणि पुलवामा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांनी रात्रभर पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांच्या सुगाव्याच्या विशिष्ट गुप्त माहितीवर कारवाई करत सुरक्षा दलांनी त्या भागात नाकाबंदी व घेराबंदीची कारवाई सुरू केली होती. त्याच वेळी सुरक्षा जवान शोध घेत असतानाच लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र सावध होत लष्करी जवानांनी तात्काळ जोरदारपणे हल्ला करीत दहशतवाद्यांना ठार केले.
याबाबत काश्मीर झोनचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, चकमकीत मारले गेलेले दहशतवादी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. मारल्या गेलेल्यांमध्ये जैश कमांडर जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे. सुरक्षा दलांसाठी हे मोठे यश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शनिवारी दोन्ही जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दोन वेगवेगळ्या चकमक सुरू झाल्या होत्या. त्याच वेळी दक्षिण काश्मीरच्या पुलवामामधील नायरा भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीवर कारवाई करत सुरक्षा दलांनी तेथे घेराबंदीची कारवाई सुरू केली होती. सुरक्षा जवान शोध घेत असतानाच लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
त्याचवेळी सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली. मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चरार-ए-शरीफ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आणखी एक चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी मारला गेला. विशेष म्हणजे या घटनास्थळावरून एके-५६ रायफलसह गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तर दुसरीकडे दि. २९ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला अनंतनागमध्ये कर्तव्यावर असताना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद यांना हसनपोरा येथील त्यांच्या घराजवळ गोळ्या घालण्यात आल्याने त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर या भागाची नाकेबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.