नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणताही देश हा येथील लष्कर किंवा सैन्यातील जवानांमुळे यांच्यामुळे सुरक्षित राहतो किंबहुना जिवंत राहतो, असे म्हटले जाते. ते निश्चितच सत्य आहे. भारताच्या बाबतीत देखील हे विधान लागू होते. भारतीय सीमेवरील तिन्ही सेना दलाचे जवान रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे रक्षण करीत असतात. ऊन, वादळ, पाऊस, थंडी इतकेच नव्हे तर रक्त गोठवून टाकणाऱ्या बर्फाच्छादित प्रदेशात हे लष्करी जवान देश कर्तव्यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. याचा प्रत्यय आपल्याला पाकिस्तान आणि चीन बरोबर वेळोवेळी झालेल्या लहान-मोठ्या युद्धामध्ये आलेला आहे. या जवानांना आपल्या कार्याचा योग्य तो मोबदला मिळणे गरजेचे असते. त्यासाठीच केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून यापुढे जोखीम असलेल्या भागातील जवानांना विशेष भत्ता देण्यात येणार आहे.
धोक्याच्या आणि अवघड ठिकाणी तैनात असलेल्या लष्करी अधिकारी आणि जवानांना अतिरिक्त भत्ता देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लष्कराच्या कमांडर्सच्या परिषदेत या प्रस्तावाला मंजुरी दिली. याअंतर्गत अधिकाऱ्यांना 10,500 रुपये आणि जेसीओ आणि जवानांना 6,000 रुपये प्रति महिना जोखीम भत्ता दिला जाईल.
या संदर्भात लष्कराकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही तरतूद तिन्ही सेवांसाठी लागू असेल आणि एकावेळी अवघड भागात तैनात सुमारे 40 टक्के अधिकारी आणि जवानांना याचा लाभ मिळेल. निमलष्करी दलात या प्रकारचा भत्ता आधीच दिला जात होता, असे निवेदनात म्हटले आहे. मात्र आता दलांसाठीही त्याची अंमलबजावणी करून ही विसंगती दूर करण्यात आली आहे.
2019 पासून हा प्रस्ताव होता. त्यामुळे 22 फेब्रुवारी 2019 पासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे संरक्षण बजेटवर 10 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.परंतु इतक्या उंच ठिकाणावर भारतीय जवानांनी चढाई करून यश मिळवले, ऐन हिवाळ्यात ज्या जवानांनी तिथे जाऊन खंदक खणले, खोल्या बांधल्या व तोफा नेल्या त्यांचे शौर्य आणि चिकाटी यांचीही आठवण ठेवली पाहिजे. लढवय्या जवान, परिपक्क नेतृत्व, उच्च मनोबल, धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुतेवर आधारलेली चारित्र्यसंपन्नता हे भारतीय सैन्याचे चार प्रमुख पैलू आहेत.