पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय लष्कराने 15 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रात पुणे येथे बॉम्बे इंजिनीअर्स ग्रुप आणि केंद्रीय संचलन मैदान येथे 77 वा सेना दिवस साजरा केला. हा प्रतिष्ठित कार्यक्रम देशाच्या इतर भागात आयोजित करण्याच्या निर्णयानुसार सेना दिवस संचलन दिल्लीबाहेर आयोजित करण्याचा हा तिसरा प्रसंग आहे. लष्कराच्या दक्षिण कमांडच्या नेतृत्वाखाली संचलन आयोजित करण्याची ही दुसरी वेळ असून पहिल्यांदा 2023 मध्ये बंगळुरूमध्ये सेना दिवस संचलन आयोजित करण्यात आले होते. युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून संचलनाची सुरुवात झाली, यावेळी लष्कर प्रमुख (COAS) जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाला विविध लष्करी आणि नागरी मान्यवर उपस्थित होते यामध्ये संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणि, दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, जनरल ऑफिसर कमांडिंग, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र, जनरल पवन चढ्ढा, इतर मान्यवर आणि परदेशी अतिथी उपस्थित होते.
दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अनुराग विज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या दिमाखदार संचलनात जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची पाहणी करणारे अधिकारी म्हणून मानवंदना स्वीकारली. 77 व्या सेना दिवस संचलनात प्रतिष्ठित 52 पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने 15 सेना पदके (शौर्य), 8 मरणोत्तर पुरस्कार आणि संपूर्ण कमांडमधील युनिट्सच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जाणारे 37 लष्करप्रमुख युनिट सन्मान प्रदान करण्यात आले. देशासाठी धैर्य, समर्पण आणि अद्वितीय सेवा देणाऱ्या जवानांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सैनिकांना संबोधित करताना, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, यांनी भारतीय सैन्याच्या सर्व श्रेणींतील सैनिक, त्यांचे कुटुंबीय, निवृत्त सैनिक, युद्ध विधवा आणि नागरी संरक्षण कर्मचारी यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. राष्ट्राच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना त्यांनी अभिवादन केले आणि या शूरवीरांच्या कुटुंबियांच्या हिताला आपले प्राधान्य असल्याची ग्वाही दिली. यावर्षी पुणे येथे आयोजित केलेल्या सेना दिवस संचलन सोहळ्याला अनन्यसाधारण महत्व असून या भूप्रदेशाच्या समृद्ध लष्करी वारशाचे ते प्रतीक आहे, असे जनरल द्विवेदी यांनी सांगितले. आपल्या वचनबद्धतेला अनुसरून देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या, आपत्ती निवारणात झोकून देऊन कार्य करणाऱ्या आणि प्रतिकूल वातावरणात शांतता प्रस्थापित करणाऱ्या जवानांच्या समर्पित वृत्तीबद्दल लष्करप्रमुखांनी अभिमानाची भावना व्यक्त केली. अतिशय महत्वाच्या पायाभूत सेवा सुविधांमध्ये सतत सुधारणा करत उत्तर आणि पश्चिम सीमेवरील कोणत्याही परिस्थितीसाठी लष्कर पूर्णपणे तयार आहे असे आश्वासन द्विवेदी यांनी दिले. भारतीय सैन्याने संपूर्ण भारतात अंतर्गत सुरक्षेमध्ये स्थैर्य आणणे सुरू ठेवले असून एका सुरक्षित आणि मजबूत राष्ट्रासाठी योगदान दिले आहे यावरही त्यांनी भर दिला.
विकसित भारत बनण्याकडे भारताच्या चाललेल्या वाटचालीत भारतीय लष्कराची महत्वाची भूमिका आहे. परिचालनात्मक सिद्धता, कार्यक्षमता आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार हे ‘परिवर्तनाचे दशक’ या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे लष्करप्रमुखांनी नमूद केले. महिला सक्षमीकरण, सैनिक, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचे कल्याण यासाठी लष्कर वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय नौदल आणि वायुदलाने सतत दिलेल्या अमूल्य पाठबळासाठी जनरल द्विवेदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. जनतेच्या विश्वासाच्या जोरावर भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यास तयार असल्याचे उद्गार त्यांनी काढले. समृद्ध व बळकट भारताच्या उद्दिष्टाच्या दिशेने देशाचा प्रवास जोमाने सुरु असल्याचे सांगत त्यांनी भाषणाचा समारोप केला.
लष्करप्रमुखांनी यानंतर माजी सैनिकांसाठी असलेल्या उत्कृष्ट कार्य पुरस्कारांचे वितरण केले. यात कर्नल (डॉक्टर) व श्रीमती रतन कुमार मुखर्जी, लेफ्टनंट कर्नल व श्रीमती मोनीश अहुजा, हवालदार व श्रीमती बजरंग निंबकर यांचा समावेश होता. निवृत्तीनंतरही या सर्वांनी समाजासाठी शिक्षण,उद्योजकता अथवा सामाजिक कामात केलेल्या बहुमोल सहभागाच्या सन्मानार्थ हे पुरस्कार देण्यात आले .
या निमित्ताने झालेल्या संचलनात आठ विविध रेजिमेंट सेंटर्स च्या पथकांचा समावेश होता. यात मराठा रेजिमेंट सेंटर, बेळगाव, आर्टिलरी सेंटर नाशिक, आर्मी ऑर्डनन्स रेजिमेंट सेंटर , सिकंदराबाद, मेकॅनाइज्ड इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर, अहिल्यानगर, मद्रास रेजिमेंटल सेंटर, वेलिंग्टन,बी ई जी सेंटर, खडकी, आर्मी सर्विस कोअर घोडदळ, यांचा समावेश होता.
या संचलनात लष्करातील महिलांचा वाढता सहभाग दर्शवणाऱ्या मिलिटरी पोलीस दलाच्या महिला अग्निवीर पथकाने व महाराष्ट्र छात्रसेना संचालनालयाच्या वतीने मुलींच्या छात्रसेना पथकाने प्रथमच सहभाग घेतला होता. या पथकांच्या सहभागामुळे भारतीय सशस्त्र सेनाची प्रगती व सर्वसमावेशकता दिसून आली. सुखोई विमानांच्या भरारीमुळे व लष्करी हेलिकॉप्टर्सच्या सहभागामुळे संचलनाची भव्यता अधिकच वाढली. परमवीर चक्र मिळवणारे मानद कॅप्टन योगेंद्र सिंग यादव व अशोक चक्र मिळवणारे कर्नल डी श्रीराम कुमार यांचाही या समारंभात सत्कार करण्यात आला.
सुभेदार मेजर प्रकाश चंद जोशी यांनी निर्देशित केलेल्या सशस्त्र सेनेच्या संयुक्त वाद्यवृंदामुळे या समारंभाला अधिकच शोभा आली होती. या वाद्यवृंदात विविध रेजिमेंट सेंटर्स मधून अनेक पथके सामील झाली होती. यात मद्रास रेजिमेंट, बॉम्बे इंजिनीअर ग्रुप, गार्डस रेजिमेंट सेंटर, आर्मी सर्विस कोअर, मिलिटरी पोलीस कोअर व पॅराशूट रेजिमेंट सेंटर च्या पथकांचा समावेश होता. यावेळी प्रथमच नेपाळ आर्मी बँड ने देखील संचलनात सहभाग घेतला, यामुळे नेपाळ व भारतामधील सांस्कृतिक बंधन आणि एकत्रित ऊर्जेचा अनुभव सूचित झाला. त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली व दोन्ही देशांमधील सौहार्द व सहकार्यभावना अधोरेखित झाली.
77 व्या सेना दिवसाच्या परेडमध्ये वाहनावर स्वार झालेल्या तुकड्यांची प्रात्याक्षिके, उपकरणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने भारतीय लष्कराची प्रगती आणि आधुनिक युद्ध तंत्रासाठीची सज्जता प्रदर्शित केली. या कवायतींमधून उपस्थितांना भारतीय लष्कराला देशाच्या रक्षणासाठी सक्षम बनणारी प्रगत शस्त्रास्त्रे आणि लष्करी तंत्रज्ञान पाहण्याची दुर्मिळ संधी मिळाली.
कवायातींमध्ये के-9 वज्र स्वयंचलित होवित्झर, पायदळाची बीएमपी-2 सरथ लढाऊ वाहने आणि शक्तिशाली टी -90 रणगाडे, या भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि अष्टपैलुत्वाचे प्रतीक असलेल्या उपकरणांचा समावेश होता.
विशेष म्हणजे, संचलनात रोबोटिक खेचर, हेरगिरी आणि आपल्या परिघाच्या सुरक्षेसाठी डिझाइन केलेले चौपदरी मानवरहित जमिनीवरील वाहन, तसेच शत्रूच्या तोफखान्याचा वेध घेऊन प्रतिकारासाठी अचूक गोळीबार करण्याची लष्कराची क्षमता वाढवणाऱ्या स्वाती वेपन लोकेटिंग रडार, यासारखे नवोन्मेषी युद्ध साहित्य प्रदर्शित करण्यात आले.
सर्वत्र ब्रीजिंग सिस्टीम, हा स्वदेशी जलद-उभारला जाणारा पूल, आणि मल्टी-बॅरल रॉकेट सिस्टम याने देखील उपस्थितांचे लक्ष वेधले, ज्यामधून विविध परिस्थितीत लढल्या जाणाऱ्या युद्धात जलद आणि कार्यक्षमतेने प्रत्युत्तर देण्याची भारतीय लष्कराची क्षमता प्रदर्शित झाली.
एटीओआर N1200- ऑल-टेरेन व्हेइकल, जे चिखल, बर्फ आणि पाण्यामध्ये अखंडपणे कार्यरत राहण्यासाठी सक्षम वाहन आहे, तसेच आधुनिक लढाईतील चपळता आणि अचूकतेवर लक्ष केंद्रित करून जलद तैनात करण्यासाठी आणि अचूक लक्ष्य साधण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले, व्हेईकल माउंटेड इन्फंट्री मोर्टार सिस्टम (व्हीएमआयएमएस), हे परेडचे आणखी महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. भविष्याचा वेध घेण्याच्या आपल्या दृष्टिकोनाला अनुसरून, परेडमध्ये यूएव्ही धोक्यांचा सामना करण्यासाठीची, ड्रोन जॅमर सिस्टम आणि दुर्गम आणि दुर्गम प्रदेशात अखंड दळणवळण सुनिश्चित करण्यासाठीचे मोबाइल कम्युनिकेशन नोड्स याचा देखील समावेश करण्यात आला होता.
परेडमध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि राष्ट्रउभारणीप्रति भारतीय लष्कराची असलेली वचनबद्धता प्रदर्शित करणारे चित्ररथ देखील होते. यापैकी एका चित्ररथावर सैनिकांमधील अॅथलेटिक प्रतिभा जोपासून त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करणाऱ्या भारतीय लष्कराच्या ‘मिशन ऑलिंपिक’ उपक्रमावर आधारित देखावा उभारण्यात आला होता.
‘राष्ट्र उभारणीमधील माजी सैनिकांची भूमिका’, या संकल्पनेवरील चित्ररथावर माजी सैनिकांनी उद्योजकता, मार्गदर्शन आणि समाजसेवेसाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. तिसऱ्या चित्ररथावर, ‘नेट झिरो कार्बन एमिशन’, अर्थात निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने भारतीय लष्कराने हाती घेतलेले उपक्रम प्रदर्शित करण्यात आले, ज्यामध्ये पर्यावरण दृष्ट्याा संवेदनशील प्रदेशांमध्ये हवामानाला अनुकूल आणि शाश्वत कार्यप्रणाली अवलंबण्याप्रति असलेल्या लष्कराच्या वचनबद्धतेवर भर देण्यात आला.
तंत्रज्ञान विषयक चित्ररथ प्रमुख आकर्षण ठरला, ज्यामधून आधुनिक युद्धात क्रांती घडवून आणण्यासाठी भारतीय लष्कराने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला अवलंब प्रदर्शित करण्यात आला. या चित्ररथावर, प्रगत सामरिक नियोजनासाठी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता)-संचालित निर्णय प्रणाली, अचूक कारवाईसाठी ड्रोन पथक, आणि महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी मजबूत सायबर सुरक्षा उपाय, यासारखे नवोन्मेशी तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले. भविष्यातील युद्धभूमीसाठी लष्कराचा पुढील पिढीच्या तंत्रज्ञानाचा वापर देखील चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आला. यामधून स्वदेशी उपायांचा लाभ घेण्यावर आणि जागतिक लष्करी प्रवृत्तींच्या पुढे राहण्यावर, तांत्रिक प्रगतीद्वारे देशाचे रक्षण करण्यासाठी आपली तयारी सुनिश्चित करण्यावर लष्कराचा सतत भर असल्याचे अधोरेखित करण्यात आले.