जम्मू – जम्मू-काश्मीरच्या पटनीटॉपमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत लष्कराचे मेजर रँकचे दोन अधिकारी शहीद झाले आहेत. उधमपूर जिल्ह्यातील पटनीटॉप परिसरात शिवगढ धार येथे ही दुर्घटना घडली आहे. भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडने ट्विट करून दोन्ही शहीद जवानांबाबत माहिती देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मेजर रोहित कुमार आणि मेजर अनुप राजपूत असे शहीद अधिकार्यांचे नाव आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक रवाना करण्यात आल्याची माहिती उधमपूर रियाजी रेंजचे पोलिस महासंचालक सुलेमान चौधरी यांनी दिली.
हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर सर्वात प्रथम स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही अधिकार्यांना बाहेर काढले. तोपर्यंत पोलिस आणि लष्कराचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. दोन्ही अधिकार्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. सोशल मीडियावर व्हायरल होणार्या जखमी जवानांच्या व्हिडिओचा वापर करू नये, असे आवाहन भारतीय लष्कराने माध्यमांना केले आहे.