इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या खेळावर पदार्पणापसूनच सर्वांचे लक्ष आहे. त्या व्यतिरिक्तही तो त्याच्या व्यक्तिगत जीवनावरून कायम चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. यावेळी निमित्त आहे ते क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जने शेअर केलेल्या फोटोचे. या फोटोमध्ये तिने अर्जुन तेंडुलकरसोबत असलेल्या कनेक्शनचा खुलासा केला आहे. जेमिमा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे डान्स करतानाचे आणि गाणं गात असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात.
पोस्टमध्ये काय?
भारतीय महिला संघातील क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत तिच्यासोबत मुंबई इंडियन्स संघाचा स्टार क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर आहे. या दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आणि वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या फोटोमध्ये जेमिमाने अर्जुन तेंडुलकरसोबत असलेल्या कनेक्शनचा खुलासा केला आहे. जेमिमा म्हणते, ‘अंडर – १२ पासून ते आतापर्यंत. आम्ही एक लांबचा पल्ला गाठला आहे…’ अर्जुन तेंडुलकर आणि जेमिमा आणि या दोघांनी मुंबईच्या अंडर – १२ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तेव्हापासून हे दोघे एकमेकांना ओळखतात. जेमिमा आणि अर्जुनसोबत या फोटोमध्ये प्रशिक्षक प्रशांत शेट्टी देखील आहेत.
अर्जुनची कारकीर्द
अर्जुन हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाचे प्रतिनिधित्व करतो. यासह आयपीएल स्पर्धेत तो मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. मात्र त्याला संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याला या हंगामात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. आयपीएल २०२३ मध्ये तो ४ सामने खेळला आणि यात त्याने ३ गडी बाद केले.