सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि खासकरुन भारतात सर्वाधिक वापरले जाणारे अॅप म्हणजे व्हॉटसअॅप. आपल्याला व्हॉटसअॅपच्या ग्रुप्सविषयी माहिती असते. पण, जो ग्रुप तयार करतो किंवा ग्रुपचा अॅडमिन असतो त्याला काही महत्त्वाच्या बाबी जाणणे आवश्यक आहे. अन्यथा हा अॅडमिन थेट तुरुंगात जाऊ शकतो. आज आपण त्याविषयीच जाणून घेऊया…
व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करणाऱ्या आणि ग्रुपमध्ये सदस्यांना अॅड करणाऱ्या ग्रुप अॅडमिनला काही अतिरिक्त अधिकार असतात. या अधिकारांसोबतच ग्रुप अॅडमिनच्या काही जबाबदाऱ्याही असतात. अशा परिस्थितीत कोणत्याही ग्रुपवर बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची जबाबदारीही ग्रुप अॅडमिनवर निश्चित केली जाते. ग्रुपमध्ये कोणत्या प्रकारचा कंटेंट शेअर केला जात आहे हे ग्रुप अॅडमिनला कळायला हवे. तसेच ग्रुपवर कोणता कंटेंट शेअर करावा याची जाणीव ग्रुप अॅडमिनला असणे आवश्यक आहे. अन्यथा ग्रुप अॅडमिनला तुरुंगवास सुद्धा सोसावा लागू शकतो.
खोट्या बातम्या आणि बनावट खाती
फेक न्यूज आणि फेक कंटेंटच्या विरोधात सरकार कठोर आहे. अलीकडेच यासाठी एक नवा नियम आला आहे, ज्याअंतर्गत फेक न्यूज आणि फेक अकाउंट चालवणाऱ्यांविरोधात तक्रार करता येते. असे खाते व्हॉट्सअॅपने बंद केले आहे. यासोबतच तक्रार निवारण अहवाल मासिक आधारावर जारी करावा लागतो.
वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ
कुणाच्याही परवानगीशिवाय त्यांचे वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर शेअर करणे बेकायदेशीर मानले जाते. असे केल्याने फोटो व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते.
देशविरोधी मजकूर
व्हॉट्सअॅप ग्रुपवर देशविरोधी मजकूर शेअर करू नका. असे केल्याने कंटेंट शेअर करणाऱ्यासह ग्रुप अॅडमिनला अटक होऊ शकते. तसेच, अशा प्रकरणात तुरुंगवास होऊ शकते. अशाच एका प्रकरणात उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात एका व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला अटक करण्यात आली आहे.
पोर्नोग्राफी
व्हॉट्सअॅपवर अश्लील गोष्टी शेअर करणे गुन्हा आहे. चाइल्ड पोर्नोग्राफी, व्हॉट्सअॅपवर वेश्या व्यवसायाशी संबंधित मेसेज शेअर करणे गुन्ह्याच्या कक्षेत येते. या प्रकरणी तुरुंगवास होऊ शकतो.
हिंसाचार
व्हॉट्सअॅपवर कोणत्याही धर्माचा अपमान करणारे व्हिडिओ आणि फोटो बनवल्यास किंवा हिंसाचार भडकावल्याबद्दल अटक होऊ शकते. हिंसाचाराला चिथावणी देणे, प्रक्षोभक पोस्ट टाकणे हे सुद्धा गुन्हा आहे.