अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
जगात सर्वात जास्त वापरले जाणारे एप म्हणून व्हॉट्सअॅपकडे पाहिले जाते. वापरण्यासाठी सोपे असल्याने या एपचा वापर सर्वाधिक आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, अशा प्रत्येकाकडे व्हॉट्सअॅप असतेच. अशा या व्हॉट्सअॅपवर आता एक नवीन फिचर येणार आहे जे ग्रुप एडमिनला अधिक शक्तीशाली बनवणार आहे. व्हॉट्सअॅप एका नव्या फिचरवर सध्या काम करत आहे. व्हॉट्सअॅप मॉडरेशन फीचर म्हणून ते ओळखले जाणार आहे. लवकरच Android आणि iOS साठी ते उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता आहे. हे नवीन फीचर सुरू झाल्यानंतर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन ग्रुपच्या कोणत्याही यूजरचा मेसेज डिलीट करू शकणार आहे. सध्या टेलिग्राममध्ये या प्रकारची सुविधा देण्यात आली आहे.
व्हॉट्सअॅप फीचर ट्रॅकिंग वेबसाइट WABetaInfo च्या स्क्रीनशॉटनुसार, मेटा-मालकीची मेसेजिंग सेवा व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट करण्याच्या फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचरमुळे, ग्रुप अॅडमिन्स व्हॉट्सअॅप ग्रुप्समधून फेक न्यूज, गुन्हेगारी आणि अश्लीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट हटवू शकतील. बॉम्बे हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्टाने असे म्हटले आहे की, सध्या व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन्स ग्रुपमध्ये पोस्ट केलेल्या आक्षेपार्ह माहितीसाठी जबाबदार नाहीत, कारण त्यांना पोस्ट काढण्याचा अधिकार नाही. त्यामुळे गेल्या वर्षी, मुंबई उच्च न्यायालयाने असे सांगितले होते की, ग्रुप अॅडमिन्सला जसे ग्रुप सदस्य जोडण्याचे किंवा काढून टाकण्याचे अधिकार आहेत आणि तसेच ग्रुपमध्ये पोस्ट केलेल्या माहितीच्या नियमनाचे किंवा ते सेन्सॉर करण्याचे, काढून टाकण्याचे अधिकार देण्यात यावे. या निर्णयानंतर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला अतिरिक्त अधिकार देण्यात येणार आहेत.
ग्रुप अॅडमिन्स ग्रुपचे जुने मेसेज डिलीट करू शकतील की नाही याबाबत व्हॉट्सअॅपकडून सध्या कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना चॅट किंवा ग्रुपमधील मेसेज डिलीट करण्याची सुविधा आहे. सध्या आपण टाकलेला मेसेज डिलीट करायचा असेल तर त्यासाठी ठराविक वेळेचे बंधन आहे. व्हॉट्सअॅप ऍडमिनसाठी ग्रुपमधील मेसेज डिलीट करण्याची मर्यादा वाढवू शकते. जेणेकरून ते ग्रुपमधील यूजर्सनी पोस्ट केलेले जुने मेसेज हाताळू शकतील.