विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोनाच्या आक्रमणानंतर जगभरात सॅनिटायझरच्या वापराच्याबाबतीत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीचा अतिरेक केला की त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. आता सॅनिटायझरचेही तसेच झाले आहे. सरकार आणि डॉक्टर वारंवार सॅनिटायझर वापरण्याचा आग्रह करीत आहे, मात्र या सॅनिटायझरच्या वापराने त्वचेचे रोग वाढत असल्याचे पुढे आले आहे. यात अल्कोहोलसह इतर रसायनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. मात्र आता तज्ज्ञांनी सॅनिटायझरच्या एवजी साबणाने हात धुणेच सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
सॅनिटायझरच्या नियमित वापरामुळे त्वचा कोरडी होत आहे. त्यामुळे वेळीवेळी त्वचेवर क्रीम, तेल लावणेही आवश्यक होऊन बसले आहे. त्यासाठी पेट्रोलियम जेलीचाही वापर करता येतो. त्या माध्यमातून त्वचेवरील कोरडपणा दूर होऊ शकतो. वारंवार सॅनिटायझर वापरल्याने त्वचा लाल होणे, खाज सुटणे आदी तक्रारी देखील डॉक्टरांकडे येत आहेत.










