वॉशिंग्टन – प्लॅस्टिक हा मानवी जीवनातील जणू काही अविभाज्य भाग बनला आहे. रोजच्या जीवनात प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी साध्या कॅरीबॅग पासून ते प्लॅस्टिक बादली, जेवणाची प्लेट इतकेच नव्हे तर मोठी वाहने आणि दैनंदिन वापराच्या वापराच्या वस्तू यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक असते. परंतु हे प्लॅस्टिकचा वाढता उपयोग पर्यावरणासाठी नव्हे तर मानवी आरोग्यासाठी देखील अत्यंत घातक आहे विशेषतः लहान मुलांच्या प्लॅस्टिक खेळणी या त्यांच्यासाठी जीवघेण्या ठरू शकतात.
प्लॅस्टिकचे प्रदूषण जगासाठी नवीन धोका म्हणून समोर येत आहेत. लहान मुलांच्या शरीरात प्रौढांपेक्षा १५ पट जास्त प्लॅस्टिकचे कण असतात. मुलांच्या शरीरात प्लॅस्टिकचे एवढे प्रमाण त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, असे मत अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. याबाबत संशोधक प्रा. कुरुन्थाचलम कन्नन म्हणतात की, पाच मिमी पेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिकचे सूक्ष्म कण वातावरणात झपाट्याने वाढत आहेत. घरांमध्ये प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर देखील वाढत आहे, ज्यामुळे प्रौढांपेक्षा मुलांच्या शरीरात प्लास्टिकचे सूक्ष्म कण वेगाने वाढत आहेत.
अनेक संशोधकांनी संशोधनादरम्यान मुलांच्या शरीरात सूक्ष्म प्लास्टिक तंतूंची पाहणी केली आहे. प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये पीईटीचे प्रमाण १५ पट जास्त असल्याचे दिसून आले. या संदर्भात कन्नन सांगतात की, लहान मुलांच्या वापरासाठी बनवलेली उत्पादने प्लॅस्टिक व्यतिरिक्त अन्य पदार्थांपासून बनवावी लागतील, त्यामुळे त्यांना सूक्ष्म प्लॅस्टिकच्या कणांच्यापासून वाचवता येईल.
सहा नवजात आणि दहा प्रौढांच्या विष्ठाची तपासणी केल्यानंतर शास्त्रज्ञांनी असा खुलासा केला आहे की, या चाचणीमध्ये मुलांच्या आणि प्रौढांच्या शरीरात पॉलीथिलीन टेरेफ्थलेट आणि पॉली कार्बोनेटचे स्तर आढळले. या दरम्यान, ३ मुलांच्या मलची तपासणी केली गेली ज्यांची जन्मानंतर पहिल्यांदा आतड्यांची हालचाल झाली होती. अशा मुलांमध्ये प्लास्टिकचे कण आढळणे हे भविष्यासाठी धोकादायक ठरणारे आहेत.
प्लॅस्टिकपासून बनवलेली खेळणी, दुधाच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे चमचे, बेडवर प्लॅस्टिकच्या चादरी, प्लॅस्टिकच्या फीडर हे मुलांच्या शरीरात प्लास्टिकचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण आहेत. मुलांचे कपडे सुंदर बनवण्यासाठी प्लॅस्टिकची रचना करण्यात येते, मात्र मुले त्याला स्पर्श केल्यानंतर ते तोंडात हात घालतात, त्यामुळे प्लॅस्टिकचा घटक त्यांच्या शरीरात जातो.