विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यातल्या त्यात ही लाट लहान मुलांवर हल्ला करणार असल्याचे भाकित असल्याने अधिकच चिंता वाढली आहे. अश्यात लोक आपापल्या परीने काळजी घेत आहेत. यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलांना वारंवार मास्क लावण्याच्या सूचना देणे. परंतु, पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क लावण्याचा आग्रह करू नका, किंबहुना मास्क लावूच नका, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
केंद्र सरकारने मुलांवरील उपचारासाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. यातच हा सल्ला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ६ ते ११ वर्ष वयोगटातील मुलांनाही केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच मास्क लावण्यास सांगावे, असे यात स्पष्ट नमुद करण्यात आले आहे. मास्क लावणे मोठ्यांसाठी अनिवार्य असले तरीही ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना मात्र मुळीच त्याची अनिवार्यता नाही, असे डीजीएचएसने सांगितले आहे. मुलांना स्टरॉईड देऊ नका, मुलांची शारीरिक क्षमता लक्षात घेऊन त्यांना ६ मिनीटे वॉक करण्यास सांगावे, असेही यात नमुद आहे.
रेमडेसिविरचा वापर करू नका
या दिशानिर्देशांमध्ये मुलांना रेमडेसिविर देऊ नका, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. केवळ गंभीर स्थिती असलेल्या मुलांनाच स्टेरॉईड द्यावा, मात्र त्याचीही आवश्यकता तपासून घ्यावी, असे सरकारने म्हटले आहे. रेमडेसिविरचा प्रभाव १८ वर्षांखालील मुलांवर कसा होतो, हे अद्याप कळू शकलेले नाही. पण मुलांना कोरोनाचे संक्रमण वाढले असेल तर आक्सीजन थेरेपी तातडीने सुरू करण्यात यावी, असे केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांमध्ये म्हटले आहे.