विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूवर मात केलेल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. अनेक जण उपचार घेतल्यानंतर बिनधास्त होत आहेत. मात्र, कोरोना पश्चातही अनेकांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचसंदर्भातील हे वृत्त आहे.
कोरोना विषाणूचा फुफ्फुसावरच नव्हे, तर मेंदूवरही परिणाम होत आहे. कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांमध्ये ही समस्या जास्त उद्भवत आहे. उन्हात गेल्यावर तीव्र डोकेदुखी, चक्कर येण्यासारख्या समस्या निर्माण होत आहे. याला न्यूरोलॉजिस्ट पोस्ट कोविड मायग्रेन असे संबोधत आहेत. कोरोना विषाणू मस्तिष्क धमण्यांनाही नुकसान पोहोचवत आहे हे अशा रुग्णांवर उपचार करताना लक्षात आले आहे.
बरेली येथील न्यूरोलॉजिस्टकडे असे रोज चार ते पाच रुग्ण येत आहेत. त्यातील काही आधीपासूनच मायग्रेन पीडितच रुग्ण होते. कोविड झाल्यानंतर त्यांचा त्रास अधिक वाढला. काहींना प्रथमच मायग्रेनचा त्रास झाला. उन्हात गेल्यावर त्यांना अर्ध्या भागात किंवा पूर्ण डोकेदुखीचा त्रास झाला.
श्री. राममूर्ती स्मारक वैद्यकीय महाविद्यालयाचे न्यूरो सर्जन डॉ. प्रवीण त्रिपाठी सांगतात, त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांना मायग्रेसनसारखेच लक्षणे दिसत होती. कोरोना विषाणू आपल्या रक्ताच्या छोट्या धमण्यांना नुकसान पोहोचवतो. रक्ताच्या गाठीसुद्धा होतात. कडक उन्हाळ्यात सूर्यकिरण मस्तिष्कावर पडल्यास तीव्र डोकेदुखीला सुरुवात होते.
मायग्रेनचे चार प्रकार
न्यूरोलॉजिस्ट डॉ. अंकुल गर्ग सांगतात, पोस्ट कोविडच्या रुग्णांमध्ये चार प्रकारच्या मायग्रेनची लक्षणे समोर आली आहेत. १) ज्या लोकांना आधीपासूनच मायग्रेनचा त्रास होता, आता तो वाढला आहे. २) कोरोनामुळे अतितणावाला बळी पडलेले ३) कोविडमुळे ज्यांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्या आहेत. ४) सायनोसायटिसही होऊ शकतो. यामध्ये रुग्णांना काळी बुरशीचा आजारही होऊ शकतो.
छत्री घेऊन बाहेर पडावे
डॉ. त्रिपाठी सांगतात, कोरोनामुक्त झाल्यानंतर जवळपास १५ दिवसांपर्यंत आराम करावा. जर कामासाठी बाहेर जावे लागल्यास काही वेळ आराम करा. उन्हात छत्री घेऊन बाहेर पडावे. थेट उन्हाच्या संपर्कात येऊ नये. यावर अद्याप कोणतेही वैज्ञानिक कारण स्पष्ट झालेले नसले तरी कोरोना आपल्या धमण्यांवर आघात करू शकतो. त्यामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.