मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने अत्याधिक जोखीम असलेल्या श्रेणीत आल्याशिवाय चाचणी करण्याची आवश्यकता नाही, अशी सूचना सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शनक सूचनांमध्ये करण्यात आली आहे. ज्यांचे वय अधिक आहे किंवा ज्यांना इतर आजार आहेत, असे नागरिक अत्याधिक जोखीम असलेल्या श्रेणीत येतील असेही म्हटले आहे.
कोरोनाच्या उद्देशपूर्ण परीक्षण रणनीतीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एका राज्यातून दुसर्या राज्यात प्रवास करणार्या नागरिकांनाही कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही असे सांगण्यात आले आहे.
सरकारने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आरटीपीसीआर, ट्रूनेट, सीबीएनएएटी, सीआरआयएसपीआर, आर-एलएएमपी, रॅपिड मॉलेक्युर टेस्टिंग सिस्टिम या रॅपिड अँटिजन टेस्ट (आरएटी) च्या माध्यमातून चाचणी केली जाऊ शकते. स्वतःच्या स्वतः केलेली चाचणी किंवा आरएटी आणि मॉलेक्युर चाचणीच्या निष्कर्षांना मान्यता दिली जाईल. परंतु एखाद्या रुग्णामध्ये संसर्गाचे लक्षणे दिसत असतील, तर त्याला वरील चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यावरही आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल.
सार्वजनिक सुविधांमध्ये राहणार्या विना लक्षणे असलेल्या नागरिकांना, घर आणि कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरणात राहणार्या रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना आठवड्यातून एकदा कोरोना चाचणी करावी लागेल.
केंद्राचा राज्यांना इशारा
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून रुग्णालयात आरोग्य कर्मचार्यांची संख्या वाढविण्याचा सल्ला दिला आहे. आगामी काळात रुग्णांची संख्या वाढण्यासह रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. याबद्दल केंद्राने यापूर्वीच राज्यांना सूचना केल्या आहेत.
मे महिन्यानंतर सर्वाधिक रुग्ण
देशात सोमवारी १,७९,७२३ नवे रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. ही संख्या गेल्या वर्षीच्या मेअखेरनंतर आढळलेल्या रुग्णांपेक्षा अधिक आहेत. गेल्या २४ तासात ४६,५६९ रुग्ण बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे १४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ७,२३,६१९ सक्रिय रुग्ण आहेत.