नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने नव्या चक्रीवादळाची हालचाल सुरू झाली आहे. एकाच वेळी दोन्ही सागरात चक्रीवादळांच्या हालचालींचा यंदा दुर्मीळ योग पाहावयास मिळणार आहे. यामुळे मान्सूनला आणखी गती मिळेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
या वर्षातील पहिलेच मान्सूनपूर्व वादळ
अरबी समुद्रातील चक्रीवादळ मुंबई व गोवा किनारपट्टीपासून ९०० कि.मी.वर आले आहे. मात्र ते पाकिस्तानच्या दिशेने समुद्रातून जाणार असल्याने मुंबईचा धोका टळणार आहे. अरबी समुद्रात २०२३ या वर्षातील पहिलेच मान्सूनपूर्व वादळ दिवसेंदिवस जोर धरत आहे. समुद्रात निर्माण झालेल्या खोल दबावाचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून ते वेगाने पुढे जात आहे. चक्रीवादळ बिपोरजॉय पूर्व-मध्य अरबी समुद्रावर केंद्रीत होते आणि गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे ८६० किमी आणि मुंबईच्या दक्षिण-नैऋत्येस ९१० किमी अंतरावर आहे. उत्तर-वायव्य दिशेकडे सरकत असताना त्याची तीव्रता वाढेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार
अलिकडच्या वर्षांत २०२० मध्ये अम्फान, २०२१ मध्ये असनी व तौक्ते तसेच २०२२मध्ये यास या प्रदेशात विकसित झालेल्या बहुतेक चक्रीवादळांनी मे महिन्यात जमिनीवर धडक दिली. आता गेल्या तीन दिवसांपासून अरबी समुद्रात बिपोर जॉय या महाचक्रीवादळाचा प्रवास वेगाने सुरू आहे. शुक्रवारी हे वादळ मुंबई व गोवा किनारपट्टी वळून पुढे सरकले. ते आता गुजरात किनारपट्टीकडून पाकिस्तानकडे जाण्याची शक्यता आहे.
सध्या चक्रीवादळ गोवा किनारपट्टीपासून ७९० किमी, मुंबई पासून ८१० किमी, पोरबंदरपासून ११०० किमी अंतरावर आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्रात चक्रीवादळाचा प्रवास सुरू असतानाच बंगालच्या उपसागरात नव्या चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून आगामी ४८ तासांत त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात व पुढे चक्रीवादळांत रूपांतर होईल, असे सांगण्यात येते.
Arabian Sea New Cyclone Depression