खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश
नाशिक : जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या सेवेतील तसेच सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा आरोग्य विषयीची फरफट आता थांबणार आहे. जिल्ह्यात वेलनेस सेंटर नसल्याने त्यांना पुणे, मुंबई येथे उपचारासाठी जावे लागत होते. खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्राच्या आरोग्य विभागाच्या पाठोपाठ आता केंद्र सरकारच्या वित्त विभागानेही नाशिक येथे वेलनेस सेंटर उभारणीस मान्यता दिली आहे. यामुळे वेलनेस सेंटर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्षांनुवर्षे रखडलेल्या वेलनेस सेंटरचा विषय मार्गी लागल्याने आज केंद्र सरकारच्या सेवेतील आणि सेवानिवृत्त असंख्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खा. गोडसे यांची भेट घेवून समाधान व्यक्त करुन आनंदोत्सव साजरा केला.
नाशिक जिल्ह्यात केंद्रीय सेवेतील तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांची संख्या मोठी असूनही केंद्र शासनाच्या सी.जी.एच.एस. या योजनेत नाशिकचा समावेश नसल्याने केंद्राकडून शहरात कल्याण केंद्रांतर्गत ‘वेलनेस सेंटर’ उपलब्ध नव्हते. त्यामुळे केंद्रीय उपचारासाठी कर्मचाऱ्यांना पुणे, मुंबई येथे जावून रुग्णालयाचा खर्च रोखीत अदा करावा लागत होता. त्यानंतर त्यांना अनेक महिन्यांनी शासनाकडून बीलाची रक्कम तीही अर्धवट परत मिळत असे. यामुळे पेन्शंन धारक जेष्ठ नागरिकांची मोठ्याप्रमाणावर गैरसोय व आर्थीक कुचंबना होत होती. नाशिक शहरात आरोग्य कल्याणकेंद्रांतर्गत ‘वेलनेस सेंटर’ व्हावे यासाठी गेल्या वर्षी पेन्शंन धारकांच्या विविध शिष्ठमंडळांच्यावतीने आर्टिलरी स्टॅटिक वर्कशॉप सिव्हील ॲण्ड एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष मनोज बागुल, यु. एन. नागपुरे, किरण मराठे, एम. के. शेख आदींनी खा. गोडसे यांची भेट घेवून ‘वेलनेस सेंटर’ च्या मान्यतेसाठी साकडे घातले होते. केंद्रीय कर्मचाऱ्यांची तसेच पेन्शंन धारकांची मागणी न्यायिक असल्याचे लक्षात येताच नाशिक शहरात ‘वेलनेस सेंटर’ व्हावे, यासाठी खा. गोडसे यांनी केंद्राकडे पाठपुरावा सुरु केला होता.
अर्टिलरी स्टॅटिक वर्कशॉप सिव्हील ॲण्ड एम्प्लॉईज अध्यक्ष मनोज बागुल, यु. एन. वाघमारे, किरण मराठे, एम. के. शेख यांच्या मागणीची खा. गोडसे यांनी गंभीर दखल घेत वेलनेस सेंटर मान्यतेसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले होते. गेल्या वर्षभरात खा. गोडसे वेळोवेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची तसेच अर्थमंत्री निर्मला सितारामण यांची भेट घेत त्यांना नाशिक शहरात ‘वेलनेस सेंटर’ ची गरज, महत्त्व व आवश्यकता पटवून दिली होती. खा. गोडसे यांनी ‘वेलनेस सेंटर’ सुरु करण्याविषयी उपस्थित केलेले मुद्दे योग्य असल्याने त्यांच्या मागणीची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकारात्मक दखल घेवून प्रस्ताव निधी उपलब्धता तसेच मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. तेव्हापासून खा. गोडसे यांचा अर्थमंत्रालयाकडे सततचा पाठपुरावा सुरु होता. अखेर आज अर्थ विभागाने वेलनेस सेंटर उभारणीस मान्यता दिली आहे. ‘वेलनेस सेंटर’ उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याने केंद्रीय सेवेतील तसेच सेवानिवृत्त असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आज केंद्र सरकारच्या सेवेतील आणि सेवानिवृत्त असंख्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खा. गोडसे यांच्या निवासस्थानी जावून त्यांची खास भेट घेवून आनंदोत्सव साजरा केला.
यांना मिळणार लाभ
जिल्ह्यात केंद्र सरकारच्या सेवेत आणि सेवानिवृत्त असलेले सुमारे २६ हजार कुंटुब असून वेलनेस सेंटरमुळे सुमारे एक लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आरोग्यविषयीच्या उपचारासाठी याचा लाभ मिळणार आहे. वेलनेस सेंटरमुळे यापुढे अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपचारासाठी पुणे, मुंबई येथे जावे लागणार नाही. सर्व उपचारासाठी तेही तात्काळ नाशिक शहरात उपलब्ध होणार असल्याने त्यांची फरफट थांबणार आहे. केंद्राच्या जी.एस.टी., आयकर विभाग, नोटप्रेस, बीएसएनएल, पोस्ट खाते, सैन्य दलातील जवान, सुरक्षा दल, आर्मी रुग्णालय, आर्मी स्कूल, मिर्लीटरी डेअरी फर्म, आर्मी एव्हीएशन स्कूल, केंद्रीय विद्यालय प्रशासन, मेट्रो लॉजिस्ट विभाग, दुरचित्रवाणी, ऑल इंडिया रेडिओ, प्रकल्प अधिकारी (डीआरडीओ), रेल्वे, ई.एम.यु., गांधीनगर प्रेस, एअर फोर्स आदी विभागातील केंद्राच्या कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शंन धारकांना वेलनेस सेंटरचा लाभ मिळणार आहे.