नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून विकसित भारत योजनेअंतर्गत नाशिकमध्ये रेल्वे पिट लाईनला मंजुरी मिळाली आहे. या पिटलाईनला मंजुरी मिळाल्याने या सुविधेमुळे भविष्यात नाशिकमधून नव्याने देशभरात रेल्वेगाड्या सुरू करता येणे शक्य होईल. नाशिकमधील प्रवाशांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. या सुविधेमुळे विशेषतः नाशिकहून मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात नियमितपणे प्रवास करणारे चाकरमानी, विद्यार्थी व व्यावसायिक यांच्यासाठी नाशिक-मुंबई स्वतंत्र रेल्वेसेवा सुरू करणे शक्य होणार आहे.
नाशिकला पिट लाईन सुरू करण्याबाबत सन २०११ पासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. माजी खासदार समीर भुजबळ आपल्या कार्यकाळात केंद्राकडे पाठपुरावा केला होता. तसेच नंतरच्या काळातही वारंवार पत्रव्यवहारासह विविध माध्यमातून आपला पाठपुरावा सुरूच होता.
त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दि. १८ जून २०२४ रोजी, तसेच दि. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री मा. अश्विनी वैष्णवजी यांना पत्र लिहून आपण पुन्हा एकदा विकसित भारत योजनेअंतर्गत टर्मिनल सुविधा आणि पिटलाईनबाबत मागणी केली होती. अखेर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नाशिकमध्ये पिट लाईनला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे.
या निर्णयांतर्गत नाशिक रोड रेल्वेस्थानक परिसरात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत नव्याने दोन स्टेबलिंग रेल्वे लाईन उभारण्यात येणार आहेत. नाशिक रोडकडून मुंबईच्या दिशेने ५ किलोमीटरवर असलेल्या ब्रिटिशकालीन देवळाली रेल्वेस्थानक येथे या पिट-लाईनची उभारणी केली जाणार आहे. या नव्या रेल्वेलाईनमुळे किसान रेल्वे, देवळाली-भुसावळ शटल, नाशिक-बडनेरा मेमू या गाड्यांसह अन्य रेल्वेगाड्यांच्या देखभाल व दुरुस्तीसह रेकमध्ये पाणी भरणे, रेकची स्वच्छता करणे शक्य होणार आहे.
पिट लाईन म्हणजे ज्या ठिकाणाहून नवीन गाड्या सुटतात आणि ज्या ठिकाणी शेवटचा थांबा घेतात, तसेच तेथे त्यांची प्राथमिक देखभाल-दुरुस्ती केली जाते. अशा प्रकारची पिटलाईन आपल्या नाशिकमध्ये नसल्याने प्रामुख्याने नाशिकमधील प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या पंचवटी एक्सप्रेस, गोदावरी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, भुसावळ एक्स्प्रेस यांसारख्या अनेक गाड्या अन्य रेल्वेस्थानकांमधून सोडल्या जात होत्या. १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमधील रेल्वे स्थानकांमध्ये पिटलाईन असावी, असे रेल्वेचे धोरण आहे. या निकषांनुसार पिटलाईनची आवश्यकता असलेल्या शहरांच्या यादीत २५ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेले नाशिक अग्रस्थानी होते. तरीही अद्याप नाशिक पिटलाईनपासून वंचित होते.
परंतु आता अखेर या पिटलाईनला मंजुरी मिळाल्याने या सुविधेमुळे भविष्यात नाशिकमधून नव्याने देशभरात रेल्वेगाड्या सुरू करता येणे शक्य होईल. नाशिकमधील प्रवाशांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. या सुविधेमुळे विशेषतः नाशिकहून मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात नियमितपणे प्रवास करणारे चाकरमानी, विद्यार्थी व व्यावसायिक यांच्यासाठी नाशिक-मुंबई स्वतंत्र रेल्वेसेवा सुरू करणे शक्य होणार आहे. तसेच २०२७ पासून प्रारंभ होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने देखील ही पिटलाईन नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. तसेच देशभरातून येणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या पार्किंगसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे.