मनमाड – भाजपचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय भाजपा खासदार डॉ.भारती पवार यांनी केलेल्या शिफारशी वरुन भारतीय रेल्वे बोर्डने दक्षिण- मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद क्षेत्रीय (झोनल) रेल्वे सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
या दक्षिण – मध्य रेल्वेच्या रेल्वेप्रवाशी जनसंपर्क व सल्लागार समितीचा कालावधी (2021-2023)या 2 वर्षाकरीता राहणार असून या समितीचे कार्यक्षेत्र (अधिकारक्षेत्र) दक्षिण -मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद क्षेत्रातील ७०० पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचे राहणार आहे.भाजपा खासदार डॉ सौ भारतीताई पवार यांचे प्रतिनिधी म्हणून नितिन पांडे या समिती वर कार्यरत राहतील. या क्षेत्रीय समितीच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशासंबंधी सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्था या संदर्भातील तक्रार निवारण, सूचना या संबंधीचे कार्य तसेच रेल्वे प्रशासन व रेल्वे प्रवाशी यांच्या समन्वयाचे कार्य असणार आहे. कायद्याचे पदवीधर असणारे नितीन पांडे यांचा रेल्वे प्रश्नासंबंधी व रेल्वे प्रवाशांच्या समस्यांसंबंधी दांडगा अभ्यास असून १९९५ पासून २६ वर्षात रेल्वे प्रश्नांसंबंधी त्यांनी अनेक जनआंदोलनांचे संयोजन व नेतृत्व केले आहे. २०१२ ते २०१५ या कालावधीमध्ये त्यांनी मुख्य प्रतिनिधी म्हणून भुसावळ विभागीय रेल्वे सल्लागार समितीवर तसेच २०१८-२० या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
मनमाड नांदगाव, लासलगांव निफाड येवला ,नगरसोल या रेल्वे स्थानक व परिसरातील अनेक रेल्वे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहे.मनमाड -नासिक लोकल सेवा सुरू व्हावी म्हणून २००४ पासून नितीन पांडे यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसच्या प्रवाशांच्या मासिक पास (MST) वरील सरचार्ज कमी करणे,मनमाड इगतपुरी शटल या प्रवासी गाडी ची वेळ दुपारी १.५० करणे,मनमाड रेल्वे स्थानकाला सुरक्षा भिंत उभारणे, जालना नगरसोल डेमो गाडी शिर्डी पर्यंत नेणे, मनमाड रेल्वे स्थानकावर झालेले नवीन वाहनतळ , नांदगाव रेल्वे स्थानकावर कामायनी एक्सप्रेस, महानगरी एक्सप्रेस यांना प्रवासी थांबा मिळवून देणे, मनमाड शहरातील रेल्वे बंधारा (महादेव बंधारा) मधील गाळ काढणे ,मनमाड रेल्वे स्थानकावर सी सी टीव्ही कॅमेरा ची संख्या वाढवणे ,तिकीट खिडक्याची संख्या वाढवणे, स्वयंचलीत तिकीट मशीन लावणे या महत्वपूर्ण कार्या सह रेल्वे च्या अनेक बाबतीत छोट्या मोठया समस्या सोडविण्यासाठी नितीन पांडे यांचे उल्लेखनीय व सातत्याने योगदान राहिले आहे.
२००६ साली स्थापन झालेल्या मनमाड-नाशिक रेल्वे प्रवाशी सेवाभावी संस्था या संस्थेच्या स्थापनेमध्ये देखील नितीन पांडे यांचा सिंहाचा वाटा आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रमुख रेल्वे स्थानकामध्ये मनमाड हे महत्त्वपूर्ण रेल्वे जंक्शन स्थानक असून नितीन पांडे यांच्या या क्षेत्रीय समितीच्या नियुक्तीने मनमाड शहराला व नाशिक ग्रामीण जिल्ह्याला प्रथमच या दक्षिण – मध्य समितीवर प्रतिनिधीत्व मिळाले आहे. नाशिक जिल्ह्यातील रेल्वे स्थानके व मराठवाडा विभागातील मनमाड संबंधित रेल्वे प्रवाशांसंबंधी प्रलंबीत असणार्या समस्या प्रवाशांच्या मागणीनुसार आवश्यक असणार्या प्रवाशी रेल्वे गाड्यांच्या थांब्या संदर्भात प्रवाशी सेवा हाच केंद्रबिंदू मानून प्रामाणिकपणे सर्वांना सोबत घेवून रेल्वे संबंधीचे सर्व प्रश्न खासदार डॉ भारती पवार यांचे मार्गदर्शन मध्ये मार्गी लावण्याचा प्रयत्न करु आणि भाजपाचे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल,खासदार डॉ. सौ.भारतीताई पवार यांनी दिलेल्या या क्षेत्रीय समितीच्या नियुक्तीच्या जबाबदारीच्या विश्वासाला सार्थ ठरवू असा मानस या नियुक्तीवर दिलेल्या प्रतिक्रियेवर भाजप जिल्हा उपाध्यक्ष व दक्षिण -मध्य च्या सिकंदराबाद क्षेत्रीय रेल सल्लागार समितीचे सदस्य नितीन पांडे यांनी व्यक्त केला आहे.
नितीन पांडे यांच्या निवडीबद्दल भाजपा नासिक जिल्हा अध्यक्ष केदानाना आहेर ,भाजप नाशिक युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे , मनमाड शहर भाजपा अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा व्यापारी आघाडी नासिक जिल्हा अध्यक्ष दत्तराज छाजेड, भाजपा नासिक जिल्हा आर्थिक सेल जिल्हा ,अध्यक्ष कांतिलाल लुणावत,भाजपा नासिक जिल्हा माथाडी कामगार सेल जिल्हाअध्यक्ष नारायण पवार नासिक भाजपा जेष्ठ नेते उमाकांत राय,भाजपा व्यापारी आघाडी चे नासिक जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी, जिल्हा सरचिटणीस सचिन लुणावत आदी प्रमुख भाजप पदाधिकार्यांसह मनमाड सार्वजनिक वाचनालय चे सचिव कल्पेश बेदमुथा अक्षय सानप व मनमाड शहरातील अनेक सामाजिक व राजकीय व इतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी नितीन पांडे यांच्या या नियुक्ती साठी अभिनंदन केले आहे.