नवी दिल्ली – केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने हवाई दलाच्या नव्या प्रमुखांची घोषणा केली आहे. सध्याचे प्रमुख एअर मार्शल आर के एस भदुरिया हे येत्या ३० सप्टेंबरला निवृत्त होत आहेत. त्यानंतर एअर मार्शल व्ही आर चौधरी हे हवाई दल प्रमुख पदाची धुरा सांभळणार आहेत. चौधरी यांना वायुसेना मेडल, परम विशिष्ट सेना मेडल, अतिविशिष्ट सेना मेडल यांनी गौरविण्यात आले आहे. २९ डिसेंबर १९८२ मध्ये ते हवाई दलात दाखल झाले होते. त्यांनी आतापर्यंत विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या ते हवाई दलात उप प्रमुख या पदावर कार्यरत आहेत. अनेक मोहिमांमध्ये त्यांनी त्यांच्या कार्याची चमक दाखविली आहे. भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्येही त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या नेतृत्वात हवाई दलाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.