इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने शनिवारी १६ व्या रोजगार मेळ्याचे आयोजन करून रोजगार निर्मिती व युवक सक्षमीकरणासाठी आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला. रेल्वे मंत्रालयाच्या समन्वयाने आणि विविध सहभागी मंत्रालये व विभागांच्या सहकार्याने हा रोजगार मेळा देशभरातील ४७ ठिकाणी एकाच वेळी पार पडला. या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना महत्त्वाच्या शासकीय मंत्रालये व विभागांमध्ये नियुक्त केले जाणार आहे, यामध्ये रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, गृह मंत्रालय, आर्थिक सेवा विभाग, श्रम व रोजगार मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (इपीएफओ)यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रामध्ये मध्य रेल्वेने मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन प्रमुख ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. ही सलग तिसरी वेळ होती की ज्या वेळी मध्य रेल्वेने एकाच वेळी अनेक शहरांमध्ये रोजगार मेळावा आयोजित केला.
मुंबईमध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात १८९ नव्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे वितरित केली. या प्रसंगी बोलताना त्यांनी राष्ट्रीय विकासात शासकीय सेवेची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करत, देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी तरुणांचे मोठे योगदान असेल असा विश्वास व्यक्त केला. नागपूरमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आग्नेय मध्य रेल्वे विभागाच्या वतीने १४८ नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. नियुक्त झालेल्यांना समाज आणि देशाची सेवा करण्याची एक उत्तम संधी म्हणून सरकारी सेवा करण्याचे गडकरी यांनी आवाहन केले. प्रामाणिकपणा आणि समर्पणाने तुमचे कर्तव्य पार पाडा, तरच यश मिळेल, असेही गडकरी म्हणाले.
पुण्यात झालेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ११४ नव्याने भरती झालेल्यांना नियुक्तीपत्रे प्रदान केली. कोरेगाव पार्क येथील IRICEN सभागृहात झालेल्या कार्यक्रमास वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देशाच्या विकासात आपल्या तरुणांना आघाडीवर आणण्यात आले ही अभिमानाची बाब आहे, असे मोहोळ यांनी म्हटले आहे.
रोजगार मेळावा ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून तिचा उद्देश देशभरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हाच आहे. इच्छुक उमेदवारांना थेट शासकीय सेवेच्या संधीही जोडल्यामुळे केवळ बेरोजगारीच्या समस्येवर उत्तर मिळत नाही, तर देशाच्या कार्यक्षम मनुष्यबळाला भारताच्या विकासयात्रेत सक्रिय योगदान देण्यासाठी सक्षम करतो.