खासदार हेमंत गोडसे यांनी दिली माहिती
नाशिक : जिल्ह्यातील शेतकरी, कारखानदार, लघूउद्योजकांच्या सोयीसाठी शहरात भव्य असे लॉजिस्टिक पार्क खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात येणार आहे. केंद्रसरकारने देशभरातील ३५ शहरांमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असून पहिल्याच टप्यात महाराष्ट्रातील नाशिक शहराचा समावेश करण्यात आला आहे. या पार्क उभारणीच्या प्रशाकीय कामाला गती मिळावी यासाठी खासदार गोडसे यांच्या पाठपुराव्यामुळे क्नॉईट फ्रँक (Knight frank) या संस्थेची तांत्रिक सल्लागार पदी नेमणूक करण्यात आली आहे.
नाशिक शहरात सुमारे शंभर एकर जागेवर लॉजिस्टिक पार्क प्रकल्प होणार असल्याने उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. याबरोबरच जिल्ह्यातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांच्या तसेच लघु उद्योजकांच्या मालासाठी कोल्ड स्टोरेज, वेअर हॉउस उभारण्यात येणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे. या पार्कच्या कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून केंद्राकडून क्नॉईट फ्रँक (Knight frank) या संस्थेची नुकतीच तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कांदा, द्राक्ष, भाजीपाला आदी पिकांचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर आहे. तसेच जिल्ह्यात सात ते आठ मोठ्या औद्यागिक वसाहती असून हजारो लघुउद्योजक आहेत. यासर्व घटकांना आपला माल विक्रीसाठी इतरत्र पाठविण्याकामी दळणवळणाचा मोठा खर्च येतो. तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे द्राक्ष आणि कांदा साठवणुकीसाठीची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांची मोठी कुचंबना होत असते. यातुनच नाशिक शहरालगत लॉजिस्टिक पार्क उभारण्यात यावा, यासाठी खासदार गोडसे यांनी वारंवार प्रयत्न करुन नाशिकला लॉजिस्टिक पार्क मंजूर करुन घेतला आहे. क्नॉईट फ्रँक (Knight frank) या संस्थेची तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणूक झाल्याने या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.