इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोविड १९ संदर्भात चीनमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. दरम्यान, आताची प्रसिद्ध कंपनी Apple Inc ने चीनबाहेर व्यवसाय करण्याची तयारी करत असल्याचे समोर येत आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ मधील एका अहवालात म्हटले आहे की कंपनीने आपल्या काही कंत्राटी उत्पादकांना सांगितले आहे की ते चीनबाहेर उत्पादन वाढवू इच्छित आहेत. कंपनी यासाठी भारत आणि व्हिएतनामसारख्या देशांकडे वळू शकते, असे या अहवालात म्हटले आहे.
अमेरिकेतील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅपलने असा निर्णय का घेतला, याबाबत दोन महत्त्वाच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षात चीन अप्रत्यक्षपणे रशियाला मदत करत आहे. त्यानंतर अनेक पाश्चिमात्य कंपन्यांना त्यांचे उत्पादन चीनवरील अवलंबित्व कमी करायचे आहे. याशिवाय चीनमध्ये कोविड १९च्या पार्श्वभूमीवर अनेक शहरांमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत, त्यामुळे या कंपन्यांनाही फटका बसला आहे.
तज्ज्ञांच्या मते अॅपलचे ९० टक्के आयफोन, आयपॅड आणि मॅकबुक लॅपटॉप चीनमध्ये बनतात. एप्रिलमध्ये Apple च्या पुरवठा साखळीशी निगडीत आव्हानांवर भाष्य करताना, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक म्हणाले, “आमची पुरवठा साखळी खरोखरच जागतिक आहे आणि यामुळेच आमची उत्पादने सर्वत्र तयार केली जातात. ते वाढवण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो. चीनमध्ये कोरोनाशी संबंधित नियम लक्षात घेता शांघाय आणि इतर शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे.” चीनमध्ये सुरू असलेल्या निर्बंधांमुळे Apple Inc सारखी मोठी कंपनी गेल्या दोन वर्षांपासून आपले अधिकारी आणि अभियंते तेथे पाठवू शकत नसल्याचेही दिसून येत आहे.
अॅपलची नजर भारताकडे का आहे?
चीननंतर कंपनी आता भारताकडे आशेने पाहत आहे. वास्तविक दोन्ही देशांची लोकसंख्या जवळपास समान आहे आणि दोन्ही देश अॅपलला उत्पादन सुरु करण्यासाठी सारख्याच सुविधा मिळणे शक्य आहे. म्हणूनच अॅपल कंपनी भारतातील उत्पादन आणि व्यवसाय वाढवण्यासाठी तिच्या काही पुरवठादारांशी सल्लामसलत करत आहे. गेल्या वर्षी जगातील ३.१ टक्के आयफोनचे उत्पादन भारताने केले होते आणि यावर्षी हे लक्ष्य ६ – ७ टक्के ठेवण्यात आले आहे.
काही तज्ञ आणि पुरवठादारांच्या मते, काही चीन-आधारित असेंबलर्सना भारतात त्यांची दुकाने सुरू करण्यात अडचणी येऊ शकतात. कारण नवी दिल्ली आणि बीजिंग यांच्यातील संबंध पूर्वीपासून ताणले गेले आहेत.
२०२०मध्ये सीमेवर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कायम आहे. हेच कारण आहे की Apple सह व्यवसाय करणारे काही चीन-आधारित उत्पादक व्हिएतनाम आणि इतर काही दक्षिणपूर्व आशियाई देशांकडे वळू शकतात.