नवी दिल्ली – कोराेनाची दुसरी लाट आली आणि जगभरातील रुग्ण्संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली. विकसित देशही यातून सुटले नाहीत. त्यामुळेच जवळपास तिसऱ्यांदा अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करावे लागले. फ्रान्सही यातून सुटलेला नाही.
तिथेही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा लागला आहे. तेथील कोरोनाचा एकंदरीत प्रादुर्भाव पाहता, अग्रगण्य मोबाइल कंपनी, ऍप्पलने फ्रान्समधील आपली सर्वच्या सर्व म्हणजे २० दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ऍप्पल इनसायडरने (AppleInsider) ही माहिती दिली आहे. दरम्यान, जगभरातील ऍप्पलची दुकाने सुरू आहेत.
ऍप्पल ऑपेराच्या पॅरिस साईटने दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्समधील ऍप्पलच्या शो रूम्स तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, ऑनलाइन फोन मागवले असतील, तर ते मिळतील, असेही ऍप्पलने स्पष्ट केले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हे स्टोअर्स बंद राहतील. यावेळी फ्रान्समध्ये जे लॉकडाऊन करण्यात आले आहे, त्यात येथील सिटी सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जानेवारीमध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये हे सेंटर सुरू होते. अत्यावश्यक सेवांशिवाय कोणतेही दुकान सुरू ठेवायचे नाही, असा आदेश काढण्यात आला आहे. याशिवाय, फ्रान्समधील शाळा आधीपासूनच तीन आठवड्यांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. त्या देखील सूचना मिळेपर्यंत सुरू करू नयेत, असे आदेश फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनी दिले आहेत. यासोबतच देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत, त्यामुळे लवकरच हा रोग आटोक्यात येईल, असा विश्वासही त्यांनी टीव्हीवरील एका भाषणात व्यक्त केला.