इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळातील लहान मुलांचा बुद्ध्यांक तर खूपच अधिक असतो विशेषतः तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आजच्या काळात लहान मुले अधिक झपाट्याने प्रगती करताना दिसतात, परंतु सर्वांनाच यश मिळतेच असे नाही, केवळ मोबाईल आणि संगणकमध्ये गुंतून पडणे म्हणजे यश नव्हे, तर त्यात काहीतरी नवीन प्रयोग करणे किंवा विधायक कामगिरी करणे यातच खरे यश आहे असे म्हटले जाते. एका ९ वर्षीय भारतीय वंशाच्या मुलीने एक आगळेवेगळे अॅप तयार करत उल्लेखनिय यश मिळवले आहे. तिच्या या अभिनव कामगिरीबद्दल अॅप्पलचे सीईओ टीम कुक यांनी तिचे अभिनंदन केले आहे, इतकेच नव्हे तर तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
सर्वात तरुण iOS अॅप डेव्हलपर
मूळची केरळ राज्यातील परंतु सध्या दुबईत राहणाऱ्या या भारतीय वंशाच्या मुलीचे नाव हाना मोहम्मद रफिक ( वय ९ वर्ष ) आहे. हानाने टीम कूक यांना तिच्या ‘स्टोरी टेलिंग अॅप हानास ‘ या अॅपबद्दल माहिती सांगणारा ईमेल पाठवला. विशेष म्हणजे हे अॅप तिने स्वतः विकसित केले आहे. ‘हानास नावाचे हे एक मोफत iOS अॅप आहे, त्यात पालक त्यांच्या मुलांसाठी कथा रेकॉर्ड करू शकतात. या अॅपमध्ये मुलांसाठी चांगल्या कथा आहेत. सध्या काही पालकांना मुलांना शिकवण्यास मोकळा वेळ मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर हानाने हे अॅप तयार करण्याचा निर्णय घेतला. हाना हे अॅप तयार केले ती आठ वर्षांची होती.
टिम कुक यांनी केला ई मेल
अॅपलचे सीईओ टिम कुकने आयफोनसाठी iOS अॅप तयार केल्याबद्दल त्याचे कौतुक केले. याबाबतच्या ईमेलमध्ये तिचे सॉफ्टवेअर आणि इतर यशाचे वर्णन केल्यानंतर त्यांनी हानाचे कौतुक केले. तसेच इतक्या लहान वयात तिने केलेल्या अनेक उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन केले. कुक यांनी असेही सांगितले की, तिने असेच कार्य करत राहिल्यास ती भविष्यात चांगला शोध लावू शकेल व यश साध्य करेल. तंत्रज्ञान जगतात टिम कुक यांचे सध्या मोठे नाव आहे.टिम कुककडून प्रशंसा मिळवणे हे जगभरातील अनेक तंत्रज्ञानप्रेमींसाठी एक स्वप्न पूर्ण असते, त्याच वेळी या नऊ वर्षांच्या भारतीय मुलीचे हे स्वप्न साकार झाले आहे, ही अभिमानाची बाब आहे.
टिम कुक :
टिम कुक ॲपल या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. टीम कूक यांनी १९९८ मध्ये ॲपल मध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०११ मध्ये त्यांना ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमण्यात आले. २०१२ च्या सुरुवातीच्या काळात त्यांना ३७ लाख अमेरिकन डॉलर पगार मिळाल्याने ते जगातील सर्वात जास्त पगार असलेला मुख्य कार्यकारी अधिकारी बनले होते. याशिवाय कुक यांच्याकडे कंपनीचे प्रमुख म्हणून ११.३० कोटी डॉलरचे शेअरही आहेत. सध्या टिम कुक यांची कमाई ७५ कोटी डॉलर ( सुमारे ५,५६० कोटी रुपये) झाली आहे. टिम कूकची कामगिरी व यश तरूणांना प्रेरणादायी आहे. समाज आणि तंत्रज्ञानाच्या विकासात त्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे.
हानाची कामगिरी :
टिमचे नाव जगभरात प्रसिद्ध असताना त्यांनी हानाला मेल केल्याने त्याची चर्चा होत आहे. एका ईमेलमध्ये हानाने सांगितले की, ती पाच वर्षांची असताना कोडिंगची पहिली ओळख झाली होती. हाना आणि लीना या दोघी बहिणी स्वतःहून शिकून कोडर बनल्या आहेत. या दोघांनाही त्यांच्या पालकांकडून प्रेरणा मिळाली. हानाची बहीण लीना हिला आशा आहे की ती पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाईल. लीनाने एक वेबसाइट तयार केली आहे, त्यात ती मुलांना शब्द, रंग आणि प्राणी याविषयी शिकवते. केरळ राज्य पुरामुळे उद्ध्वस्त झाले होते तेव्हा लीनाने तिच्या वेबसाइटवर मुख्यमंत्री निधीची लिंक समाविष्ट केली होती.
पित्याला अभिमान :
हानाने सांगितले की, हे अॅप बनवण्यासाठी तिला सुमारे १० हजार ओळींचा कोड लिहावा लागला. अॅप तयार करण्यासाठी ती कोणतीही प्री-मेड थर्ड-पार्टी लायब्ररीज, क्लासेज किंवा कोड्सची मदद घेत नाही. यामुळे ती जगातील सर्वात तरुण तंत्रज्ञ आहे. तिने कथाकथन अॅप तयार केले असून सर्व पालक त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या स्वतःच्या आवाजात कथा रेकॉर्ड करण्यासाठी वापरू शकतील. भारतीय वंशाच्या हानाला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे आहे. तिने अॅपलमध्ये नोकरी करण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. तिला आशा आहे की एक दिवस ती टिम कुकसाठी काम करू शकेल. हानाचे वडील मोहम्मद रफिक यांनी पहिल्यांदा टिम कुकचा ईमेल पाहिला तेव्हा त्यांना हाना आणि लिनाचा खूप अभिमान वाटला.
Apple Ceo Tim Cook Praise 9 Year Old Girl