पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिग्गज अॅपल कंपनीने भारतात एकामागून एक त्यांचे दोन अधिकृत रिटेल स्टोअर उघडले आहेत. या स्टोअर्सचे उद्घाटन करण्यासाठी अॅपलचे सीईओ टीम कुक स्वतः भारतात आले होते. मुंबईचे स्टोअर ब्रँडच्या कुर्ला कॉम्प्लेक्स, जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉल मध्ये तर दिल्लीचे स्टोअर साकेत सिटी वॉक मॉल येथे आहे. याचनिमित्ताने कंपनीचे सीईओ टीम कुक यांच्या जीवनशैलीबद्दल जाणून घेऊया…
खरंतर, टिम कुकचा प्रवास अतिशय विलक्षण आहे. आपल्या संघर्षाच्या दिवसात कुकने लोकांच्या घरात वृत्तपत्रे वाटण्यापर्यंत काम केले आहे, पण हे त्याच्या मेहनतीचे फळ आहे की आज कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक असलेल्या टीम कुकला दररोज इतका पगार मिळतो, जे सर्वसामान्य माणूस अनेक वर्षे कष्ट करुनही त्याला मिळणार नाही.
अमेरिकेच्या दक्षिणपूर्व भागातील अलाबामाचे कुक रहिवासी आहेत. त्यांचे वडील शिपयार्ड कामगार होते आणि त्यांची आई फार्मसीमध्ये काम करत होती. त्यावेळी टीमच्या कुटुंबाचे उत्पन्न घराचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे नव्हते. अशा परिस्थितीत ते लोकांच्या घरी वर्तमानपत्रे पोहोचवत असत. इतकेच नाही तर टीम कुकने अनेक वर्षे फार्मसीमध्येही काम केले आहे. टीमने 1988 मध्ये डरहम, नॉर्थ कॅरोलिना येथील ड्यूक युनिव्हर्सिटीच्या फुक्वा स्कूल ऑफ बिझनेसमधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली.
टीम जेव्हा १९९८ मध्ये अॅपलमध्ये सामील झाली तेव्हा कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. २००० मध्ये, कुक यांना अॅपलचे विक्री आणि व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष बनवण्यात आले. यानंतर, २००४ मध्ये, त्यांनी अंतरिम सीईओ आणि मॅकिंटॉश विभागाचे प्रमुखपद भूषवले. २००९ मध्ये, स्टीव्ह जॉब्स प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर गेले, त्याच वेळी कुक यांची अंतरिम सीईओ म्हणून घोषणा करण्यात आली. २०११ मध्ये जेव्हा स्टीव्हचा मृत्यू झाला तेव्हा टीमला अधिकृतपणे कंपनीचे सीईओ बनवण्यात आले.
कंपनीचा पदभार स्वीकारल्यानंतर कुकने ती खूप उंचीवर नेली. २०११ मध्ये टीम कुक सीईओ बनल्यापासून, ती २३५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅपसह जगातील सर्वात श्रीमंत टेक कंपनी बनली आहे. ६२ वर्षीय टीम कुक यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती १.८ अब्ज डॉलर्स म्हणजेच १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. २०२२ या वर्षात कुकला ९९.४ दशलक्ष डॉलर किंवा ८१५ कोटी रुपये मिळाले, ज्यात त्याच्या पगाराचा समावेश आहे. इतकंच नाही तर टीम यांना ८३ मिलियन डॉलर स्टॉक अवॉर्ड आणि बोनस देखील मिळाला.
काही काळापूर्वी टीम यांनी स्वतःच आपले पॅकेज कमी करण्याची घोषणा केली होती. स्वतः टीम कूकने त्यांचे वार्षिक पॅकेज ४९ दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे ४०२ कोटी रुपये कमी केले. त्यानुसार आता त्यांची एका दिवसाची कमाई जवळपास १.१० कोटी रुपये आहे. म्हणजेच वर्षानुवर्षे कष्ट करून माणूस जेवढे कमावतो तेवढीच ही रक्कम आहे.
एका मुलाखतीत, टीम यांनी नमूद केले होते की, ते कोणत्याही परिस्थितीत पहाटे ३.४५ वाजता उठतात. उठल्यानंतर, ते प्रथम ऍपलच्या उत्पादनांवर लोकांचे पुनरावलोकन आणि प्रतिक्रिया वाचतात. यामुळे आपल्या उत्पादनांमध्ये नक्की काय सुधारणा आवश्यक आहेत हे जाणून घेतात. या अभिप्रायावर काम व्हायला हवे, असे त्यांना वाटत असेल, तर ते त्या मुद्यावर काम करतात. यानंतर ते पहाटे पाचच्या सुमारास जिममध्ये जातात. हेच टीम कुकच्या यशाचे रहस्य आहे.
Apple CEO Tim Cook Life Style Journey Salary