मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. साहजिकच शिवसेना भाजप युतीला राज्यात सत्ता असूनही अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार असलेल्या मतदारसंघातच मतदारांनी या उमेदवारांना नाकारून सरकारवर अप्रत्यक्षपणे रोष व्यक्त केला आहे, असे मत उद्धव गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महापालिकांच्या निवडणुका घेतल्यास त्यामध्ये आमचाच विजय होईल त्यामुळे सरकार निवडणुका लांबवित येत आहे, त्याचप्रमाणे मुंबई येथे उद्धव ठाकरे यांची सभा विराट होणार असून या सभेला प्रचंड गर्दी होणार आहे, असे सांगत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर देखील टीका केली आहे.
राऊत म्हणाले की, बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. सहाजिकच मतदारांनी शिंदे गटाच्या आमदारांना नाकारले असे यातून स्पष्ट होत आहे. शिवसेनेशी गद्दारी केली तिथेच शिवसेना जिंकली असून हा जनमताचा कौल आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडीला निर्विवाद यश मिळाले असून या निकालाने सरकारच्या कंबरड्यात पहिली लाथ मारली आहे. मिंधे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात आमची शिवसेना जिंकली आहे. पारोळा, मालेगाव आणि बुलढाणा या मिंधे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात आम्ही जिंकलो आहोत. ही लोकांची मन की बात आहे. शिवसेनेशी गद्दारी झाली, तिथे शिवसेना आणि महाविकास आघाडीचे पॅनल विजयी झाले. शिवसेनेवर घाणेरडे आरोप केले तिथे त्यांचा पराभव केला. आता हा लोकमताचा कौल आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, आता हिंमत असेल तर मुंबईसह १४ महापालिकेच्या निवडणुका घ्या घेऊन दाखवाव्यात असे आमचे आवाहन आहे पण ते निवडणुका घेणार नाही. कारण तुम्हाला भीती वाटते. काल जसे निकाल लागले तसे हे निकाल लागतील. विधानसभा, लोकसभा या प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळेल असे वातवरण आहे, असेही राऊत म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडीची विराट सभा झाल्या. आता मुंबईत आघाडीची अतिप्रचंड व अतिविराट सभा होत आहे. उद्याची सभा ऐतिहासिक ठरेल. जनमानसाचा निकाल कुणाच्या बाजूने आहे, हे स्पष्ट होईल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले आहेत. उद्या आमची सभा होत आहे. ही सभा अतिविराट होणार आहे. त्याची तयारी कशी चालली हे पाहण्यासाठी शाह आले असतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
APMC Election Shinde Group MLA Constituency Result Politics