औरंगाबाद/पैठण – मराठवाडा ही संतांची भूमी असून येथे अनेक संत होऊन गेलेत, सहाजिकच या संतांच्या जन्मदिन आणि पुण्यतिथीला विविध प्रकारचे धार्मिक सोहळे साजरे होतात. गेल्या दीड-दोन वर्षांपासून धोरणाच्या सावटामुळे मठ मंदिरे तसेच धार्मिक कार्यक्रम देखील बंद होते. परंतु दसरा-दिवाळी दरम्यान काहीसे वातावरण सकारात्मक झाल्याने पुन्हा एकदा धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
त्यातच संत ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी म्हणजे पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगावात माऊलींचा संजीवन समाधीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा या सोहळ्याची तिथी गुरुवार, दि.२ डिसेंबर रोजी असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वारकरी आणि भक्त परिवार जमला होता आणि त्याच वेळी एक अद्भुत आणि आगळी वेगळी घटना घडली ती म्हणजे सर्वत्र पाऊसामुळे ढगाळलेले वातावरण असताना केवळ ज्ञानदेव माऊलींच्या समाधीच्या मुखकमलावर सूर्यकिरणे पडली.
विशेष म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी कार्तिक वद्य त्रयोदशी या दिवशी संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या २१ व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली, ती वेळ होती दुपारी १ वाजेची. आता देखील तीच वेळ साधत आपेगाव येथील मंदिरातही माऊलींच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडावीत, यासाठी वास्तुशास्त्रज्ञ महेश साळुंके आणि खगोलशास्त्रज्ञ गेल्या दोन वर्षांपासून सूर्यकिरणे आणि पृथ्वीच्या भ्रमणाचा अभ्यास करीत आहेत.
त्यानुसार तयार केलेल्या यंत्रणेला समाधीच्या क्षणांवेळी म्हणजेच गुरूवारी यश येईल की नाही, याबाबत काहीशी शंका वाटत होती. कारण मागील आठवडाभरापासून महाराष्ट्रातील अनेक भागात तसेच औरंगाबादसह मराठवाड्यात कुठेही सूर्यदर्शन झाले नव्हते. पण संजीवन समाधीच्या वेळी अगदी चार मिनिटे ढगाळलेल्या वातावरणातही सूर्य डोकावला आणि माऊलीच्या मुखकमलावर सूर्यकिरणे पडली.
किरणोत्सवाचे दर्शन झाल्यावर भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून आला. परंतु समाधी सोहळ्याची वेळ साधत माऊलींच्या मूर्तीवर प्रकाशकिरणे पडावीत, यासाठी सूर्य आणि पृथ्वीच्या भ्रमणाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करण्यात आला. वास्तुशास्त्रज्ञ महेश साळुंके आणि खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी हा मेळ जुळून येण्यासाठी मागील तब्बल १२० वर्षांत या तिथीला सूर्य कोणत्या स्थानी होता, याचा अभ्यास केला. समाधी क्षणांनाच सूर्याने दर्शन दिले. त्याच वेळी मंदिरात माऊलींच्या नावाचा जयघोष सुरु झाला अन् खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. भाविकांना समाधी क्षणांची अनुभूती येण्यासाठी विज्ञानाच्या, खगोलशास्त्राच्या माध्यमातून केलेल्या अथक प्रयत्नांसाठी ओघळलेले ते आनंदाश्रू होते.
श्रीक्षेत्र आपेगाव येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले होते. मात्र कोरोना काळामुळे मंदिरात कुणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कार्तिक काल्याच्या दिवशी समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आपेगाव येथील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मागील १२वर्षांपासून काम करणारे वास्तुशास्त्रज्ञ महेश साळुंके यांनी या किरणोत्सव सोहळ्यासाठी विशेष सहकार्य केले. यासाठी खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांचं विशेष मार्गदर्शन लाभले.