बार्सिलोना (स्पेन) – कॉम्प्युटर अँटीव्हायरस क्षेत्रातील बाप माणूस अशी ओळख असलेले आणि McAfee चे संस्थापक जॉन मॅकफी हे येथील एका तुरुंगात मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. गेल्या ९ ते १० महिन्यांपासून ते तुरुंगात असल्याने त्यांना नैराश्याने ग्रासल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या वकीलाने तशी माहिती दिली आहे.
स्पेन आणि अमेरिका यांच्यात मॅकफी यांच्याविषयी बोलणी सुरू होती. मॅकफी यांचे अमेरिकेत प्रत्यार्पण केले जाणार होते. कॉम्प्युटरला सुरक्षित ठेवणारे अँटीव्हायरस मॅकफी या कंपनीने बनविले होते. ते जगातील पहिले अँटीव्हायरस आहे. अमेरिकन एजन्सींपासून पळ काढत मॅकफी हे स्वतःचा बचाव करीत होते. अमेरिकेत मोठी करचोरी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल आहे. बार्सिलोना विमानतळावरुन त्यांना स्पेन पोलिसांनी ताब्यात घेतलं. इंग्लंडचा पासपोर्ट वापरुन ते इस्तंबूलला जात होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली आणि कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना तुरुंगात टाकण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यातच आता त्यांचा मृत्यू झाला आहे.