नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय नौदल यांनी एकत्र येऊन कल 25 फेब्रुवारी 2025 रोजी चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी तळावरून (आयटीआर) नौदलाने विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकारच्या जहाज विरोधी क्षेपणास्त्राची (एनएएसएम-एसआर) यशस्वी हवाई चाचणी घेतली. भारतीय नौदलाच्या सीकिंग हेलिकॉप्टरमधून हे क्षेपणास्त्र सोडल्यानंतर जहाजरुपी लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची त्याची क्षमता या चाचणीतून दिसून आली.
या चाचणीतून या क्षेपणास्त्राचे मॅन-इन-लूप वैशिष्ट्य सिद्ध झाले आहे आणि या क्षेपणास्त्राने त्याच्या महत्तम कक्षेत समुद्राच्या पाण्यावरुन अधांतरी प्रवास करत लक्ष्य म्हणून निश्चित केलेल्या एका लहान जहाजाचा थेट आणि अचूक वेध घेतला. माऱ्याच्या शेवटच्या बिंदूबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हे क्षेपणास्त्र स्वदेशी इमेजिंग इन्फ्रारेड सीकरचा वापर करते. या मोहिमेने उच्च बँडविड्थसह दुहेरी डाटा लिंक प्रणालीच्या कार्याचे देखील दर्शन घडवले. ही प्रणाली, वैमानिकाला विमानातून लक्ष्यावर परत लक्ष केंद्रित करण्यासाठी लक्ष्याच्या थेट प्रतिमा पाठवण्यासाठी वापरली जाते.
हे क्षेपणास्त्र सोडल्यानंतर बेअरिंग-ओन्ली लॉक-ऑन पद्धतीने प्रक्षेपित करण्यात येते जेणेकरून जवळच्या परिसरातील अनेक लक्ष्यांपैकी एका लक्ष्याची निवड करता यावी. सुरुवातीला शोधाच्या विशिष्ट परिघातील मोठ्या लक्ष्याची निवड करून क्षेपणास्त्र सोडण्यात आले आणि माऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात वैमानिकाने लपलेले छुपे लक्ष्य निवडले आणि संपूर्ण अचूकतेसह क्षेपणास्त्राने त्या लक्ष्याचा वेध घेतला.
या क्षेपणास्त्रात प्रवासादरम्यानच्या मार्गदर्शनासाठी स्वदेशी फायबर ऑप्टिक गायरोस्कोप आधारित आयएनएस आणि रेडीओ अल्टीमीटर, एकात्मिक एव्हीओनिक्स मोड्यूल, इलेक्ट्रो-मेकॅनिकल अॅक्युरेटर तसेच जेट व्हेन नियंत्रण, औष्णिक बॅटरीज आणि पीसीबी वॉरहेड अशा यंत्रणा वापरण्यात आल्या आहेत. हे क्षेपणास्त्र इन-लाईन इजेक्टेबल बुस्टर सह मजबूत प्रोपल्शन आणि लॉंग-बर्न सस्टेनर चा वापर करते. या हवाई चाचणीत मोहिमेची सर्व उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यात आली.
इमारत संशोधन केंद्र, संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, उच्च उर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा आणि टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळा यांसह डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळांच्या संयुक्त प्रयासातून विकसित करण्यात आले आहे. एमएसएमईज, स्टार्ट अप उद्योग आणि इतर उत्पादन भागीदारांच्या मदतीने विकसन आणि उत्पादन भागीदारांतर्फे सध्या या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात येत आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी हवाई चाचण्यांसाठी डीआरडीओ, भारतीय नौदल तसेच सहभागी उद्योगांचे अभिनंदन केले आहे. मॅन-इन-लूप वैशिष्ट्याच्या चाचण्या एकमेवाद्वितीय असून त्यांच्यामुळे हवेतून पुन्हा लक्ष्यावर मारा केंद्रित करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे असे ते म्हणाले.
केंद्रीय संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे प्रमुख डॉ.समीर कामत यांनी देखील डीआरडीओचे संपूर्ण पथक, वापरकर्ते तसेच औद्योगिक भागीदारांचे अभिनंदन केले आहे.