नाशिक – यथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता (उत्तर विभाग) येथील मुख्य आणि वरिष्ठ लिपिक हे १० हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडले आहेत. प्रविण नामदेव पिंगळे (मुख्य लिपीक) आणि श्रीमती लता शांताराम लहाने (वरिष्ठ लिपीक) अशी या दोघांची नावे आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याच विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याकडून त्यांनी लाच मागितली होती. सेवापुस्तिका पडताळणी आणि रजेच्या फरकाचे व अन्य बीले मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने सापळा रचला. या सापळ्यात पिंगळे आणि लहाने हे रंगेहाथ पकडले गेले. आज दुपारच्या सुमारास आपल्याच कार्यालयात या दोघांनी १० हजार रुपये घेत असताना एसीबीने त्यांना पकडले. त्याची तत्काळ दखल घेत एसीबीच्या पथकाने पिंगळे आणि लहाने यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. यासंदर्भात काहीही तक्रार असल्यास एसीबीच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.