पुणे – पिंपरी-चिंचवड महापालिकेत आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थायी समिती ही महापालिकेची तिजोरी असल्याचे समजली जाते. आणि याच स्थायी समितीच्या सभापतीसह पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यात स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरिया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आज मनपा स्थायी समितीची सभा होती. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने महापालिका मुख्यालयात प्रवेश केला आणि अनेक तास एसीबीचे पथक येथे ठिय्या मांडून होते. यासंदर्भात एसीबीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. या कारवाईमुळे महापालिकेतील अनेकांचे धाबे दणाणले आहे. कुठल्या प्रकरणात आणि किती रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.