इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राज्याच्या विविध भागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) धाडी आणि त्यात रंगेहाथ सापडणाऱ्यांचे कारनामे सतत उजेडात येत असतात. आताही औरंगाबादमधून एक मोठे वृत्त समोर येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा इंजिनिअरकडे मोठं घबाड एसीबीच्या हाती लागलं आहे. ते पाहून एसीबीचे अधिकारीही चक्रावले आहेत.
शाखा इंजिनीअर संजय राजाराम पाटील याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. मंदिराच्या सभागृहाच्या कामाचे बील मंजूर करण्यासाठी पाटीलने तब्बल सव्वा लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर ४० हजार रुपयांमध्ये तडजोड करण्याच आली. अखेर ही तक्रार एसीबीकडे आली. एसीबीने सापळा रचला आणि त्यात पाटील बरोबर अडकला. त्यानंतर एसीबीच्या पथकाने पाटीलच्या संपत्तीकडे होरा वळवला. त्यात आता अनेकानेक बाबी समोर येत आहेत.
एसीबीने पाटीलच्या बंगल्याची झडती घेतली. या बंगल्यात एक लॉकर सापडले आहे. हे लॉकर उघडताच त्यामध्ये नोटाच नोटा आढळून आल्या आहेत. ५०० आणि २ हजार रुपयांच्या या नोटांचे बंडल लॉकरमध्ये ठेवलेले होते. ते पाहून अधिकारी अवाक झाले. या संपत्तीची मोजदाद केली असता केवळ एका लॉकरमध्येच तब्बल ८५ तोळे सोने आणि २६ लाख ४ हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. हे एवढे पैसे कुठून आले, त्याचा शोध आता सुरू झाला आहे. तसेच, पाटीलचे बँकांमध्येही खाती आहेत का, तेथेही लॉकर आहेत का, अन्य बाबींची शहानिशा सध्या सुरू आहे. पाटीलची स्थावर आणि जंगम मालमत्ता किती आहे, कुणाच्या नावावर आहे, त्यात वडिलोपार्जित किती आहे, यासह अनेक बाबींचा सखोल तपास एसीबीचे पथक करीत आहे. तूर्त तरी ही बाब सध्या राज्यभर चर्चेची ठरली आहे.