नाशिक – शासकीय घरकुल योजनेअंतर्गत बांधकाम केलेल्या शौचालयाच्या प्रकरणाचा अहवाल तयार करण्यासाठी चांदवड तालुक्यातील दहेगाव (म) येथील ग्रामसेवक चंद्रकांत तुकाराम पाटील याने तब्बल २७ हजार ५०० रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार करण्यात आली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. अखेर तडजोडी अंती २५ हजार रुपयांची लाच स्विकारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एसीबीच्या पथकाने चंद्रकांत पाटील विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पाटीलला अटक करण्यात आली असून याप्रकरणी एसीबीचे पथक पुढील तपास करीत आहे. दरम्यान, लाच देणे किंवा घेणे गुन्हा आहे. असा प्रकार घडत असल्यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.