औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबाद महापालिकेचा शाखा अभियंता संजय चामले हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. त्यानंतर एसीबीच्या पथकाने चामले याच्या घराची झाडाझडती घेतली आहे. या झडतीत मात्र धक्कादायक बाब समोर आली आहे. चामले याच्या घरात तब्बल ४३ तोळे सोने, साडेतीन किलो चांदी, साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे एसीबीच्या पथकाच्या हाती लागली आहे. त्यामुळेच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
चामले याने ३ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि चामले हा ३ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेला. चामले याने एक बांधकाम नकाशा (लेआऊट) मंजूर करण्यासाठी ही लाच मागितली होती. चामले हा महापालिकेच्या नगररचना विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहे.
चामले याच्या घराच्या झडतीत मोठे घबाड गवसल्याने एसीबीने या सर्व प्रकरणाचा तपास गांभिर्याने घेतला आहे. आता पुढील टप्प्यात एसीबीच्या पथकाकडून चामले याच्याकडील प्रॉपर्टी आणि अन्य कागदपत्रांची कसून तपासणी करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.