जयपूर (राजस्थान) – नोकरी लागावी म्हणून तरुण जीवापाड मेहनत घेतात. स्पर्धा परीक्षांसाठी दिवसरात्र एक करतात. त्यात बोटावर मोजण्या इतक्या जणांना यश येते. असाच एक तरुण स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी विभागात लागला. मात्र, पैशाचा हव्यास त्याला नडला. नोकरी लागून अवघे तीन वर्षे झाले असतानाच तो तब्बल ३ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडला गेला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आयकर विभागातील कनिष्ठ अभियंता पंकजकुमार चौधरी याला दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. पंकजचा सहकारी कनिष्ठ अभियंता दिव्या प्रकाश मीणा याने मोबाईल बंद करून पळ काढला. एसीबीचे अधिकारी म्हणाले की, दोन्ही आरोपी सीपीडब्ल्यूडीच्या प्रतिनियुक्तीवर आयकर विभागाच्या मूल्यांकन विभागात कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या मालमत्तेचे मूल्यांकन कमी करण्याच्या बदल्यात ही लाचेची रक्कम घेतल्याचे त्यांनी सांगितले. तक्रारदाराने एसीबीमध्ये तक्रार दिली होती. मालमत्तेची वाढीव किंमत लावल्याने त्यांनी आयकर विभागाकडे दाद मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कनिष्ठ अभियंता पंकज आणि दिव्य प्रकाश यांची समिती स्थापन करण्यात आली. दोघांनीही पाच लाखांची लाच देऊन मालमत्तेची किंमत पंचवीस लाख रुपये करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाच घेऊन हा सौदा ठरला. एसीबीचे एएसपी नरोत्तमलाल वर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन्ही आरोपींच्या लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीत खातरजमा झाल्यानंतर पंकजला एसीबीने पकडले, तेव्हाच त्याचा सहकारी सुगावा लागला आणि पळून गेला. विशेष म्हणजे दोन्ही कनिष्ठ अभियंता तीन वर्षांपूर्वी नोकरीवर रुजू झाले आहेत.