पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय शासन व्यवस्थेला भ्रष्टाचाराने पोखरून काढले आहे, असे म्हटले जाते. केवळ राजकीय नेते नव्हे तर अनेक अधिकारी सुद्धा भ्रष्टाचारी असल्याने सर्वसामान्य जनतेची मोठी पिळवणूक होते. कोणतेही शासकीय काम असो लाच दिल्याशिवाय होणार नाही, अशी जणू काही सर्वसामान्य नागरिकांची भावना झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सलग लागोपाठ दोन शासकीय अधिकाऱ्यांकडून एका पाठोपाठ लाच घेण्याचे प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याने वीजेचे कनेक्शन बंद करण्यासाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या अभियंत्याने पन्नास हजार रुपये लाच म्हणून मागितली आणि आता तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला आहे.
संतोष कुमार गित्ते (वय३१ ) हे महावितरणच्या भोसलीच्या उपविभागात ज्युनियर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. त्यांनी वीजजोड बंद करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली आहे. वीज कनेक्शन करण्यासाठी पिंपरीतील एका व्यक्तीने अर्ज केला होता. त्यांना त्यांच्या कंपनीचं वीज कनेक्शन बंद करायचं असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्यावर कारवाई करण्यासाठी हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मात्र या व्यक्तीला ही लाच द्यायची नव्हती त्यामुळे त्यांनी लाचलुचपत विभागात तक्रार केली. अखेर लाचलुचपत विभागाने या अभियंत्यावर कारवाई केली. त्यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. अशाप्रकारे शासकीय कामासाठी कोणी लाच मागत असेल, तर 1064 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत विभागाने केले आहे.
गेल्या माहिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगर रचना विभागाच्या सर्वेअरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच मागितल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. ही कारवाई दुपारी झाली होती. या कारवाईमुळे महापालिकेत खळबळ उडाली होती. संदीप लबडे असे लाच घेणाऱ्या सर्वेअरचं नाव होतं. लबडे हे पिंपरी-चिंचवड महापालिका नगररचना विभागात सर्वेअर म्हणून कार्यरत होते. लबडे यांनी आधी तीन आणि काम झाल्यानंतर साडेतीन लाखांची लाच मागितली होती. लबडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते.
पुणे शहरात सतत लाचलुचपतीचे प्रकरणं समोर येत आहेत. त्यात शासकीय कामासाठी किंवा अन्य कामासाठी लाच मागितल्याचे प्रकरणं जास्त प्रमाणात आहे. या सगळ्यांवर आळा घालण्यासाठी लाचलुचपत विभाग कायम कार्यरत असतं. त्यामुळे शासकीय कामांसाठी जर अशा प्रकारची लाच मागण्याचा कोणी प्रयत्न केला तर 1064 या टोल फ्रीनंबरवर संपर्क करण्याचं आवाहन लाचलुचपत विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र सध्या लाच प्रकरणामुळे सर्वसामान्य जनतेत याची चर्चा सुरू आहे.
Anti Corruption Raid Bribe Engineer Trap 50 Thousand
ACB Pune Pimpri Chinchwad Electricity Connection