नाशिक – तब्बल ८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर, वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि शिक्षक पंकज दशपुते या तिघांविरोधात आज पहाटेच्या सुमारास भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाे (एसीबी) पथक नाशिक न्यायालयात हजर करणार आहे. तिघांचीही चौकशी करण्यासाठी त्यांची पोलिस कोठडी न्यायालयाकडे मागितली जाणार आहे. या प्रकरणामुळे राज्यभरातील शिक्षण विभागाचा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. वर्ग एकचे अधिकारी लाखो रुपयांच्या लाचेची बिनदिक्कतपणे मागणी करुन ती स्विकारत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एसीबीच्या पथकाने कारवाई केली होती. त्यानंतर जवळपास ७ ते ८ तासांनी म्हणजेच पहाटे साडेचार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, न्यायालय काय निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.