मुंबई – भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी, 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वतंत्र भारत @ 75 : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे’ ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.
दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थामार्फत या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक २६ ऑक्टोबर, २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाच्या प्रतिज्ञेने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख किंवा ज्येष्ठतम अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी / कर्मचारी प्रतिज्ञा घेतील. प्रतिज्ञा घेतल्यानंतर मा.राज्यपाल व मा.मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात येईल.
दक्षता जनजागृती सप्ताहासंदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करताना कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी त्या-त्या क्षेत्रात लागू असलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन होईल याबाबत आयोजकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी याबाबत संबंधित नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. तसेच, भ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असल्याने ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुजाण नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक 022-24921212, वेबसाईट acbmaharashtra.gov.in, ईमेल – acbwebmail@mahapolice.gov.in/ addlcpacbmumbai@mahapolice.gov.in, फेसबुक – http://www.facebook.com-maharashtra-ACB, मोबाईल ॲप – www.acbmaharashtra.net, ट्वीटर – @ACB_Maharshtra, व्हॉट्सॲप – 9930997700 येथे संपर्क साधून तक्रार नोंदवावी अशी माहितीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत देण्यात आली आहे.