नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरासह जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे की काय अशी शंका येत आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) आडगाव पोलिस स्टेशनच्या हवालदारावर लाच घेतल्याप्रकरणी काल गुन्हा दाखल केला. त्यातच आज भद्रकाली पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस नाईक यांनाही रंगेहाथ पकडले. त्यातच आज दिवसभरातच एसीबीने आणखी एका सापळ्यात कळवण तालुक्यातील तलाठी आणि कोतवाल यांना पकडले आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, कळवण तालुक्यातील गोसराणे येथील तलाठी राधा दिनकर महाले-पालवी आणि जयदर येथील कोतवाल पोपट काळुराम भोये या दोघांना ३५ हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. वाळूच्या ट्रॅक्टरवर कारवाई करु नये, वाहतूक सुरळीत रहावी यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या दोघांनी लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. त्यामुळे यासंदर्भात तक्रार करण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.