इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद घेऊन जम्मू काश्मिर व हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान, २५ सप्टेंबरला दुसऱ्या तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबरला होणार आहे. तर हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या दोन्ही विधानसभा निवडणकुीची मतमोजणी ४ ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती केंद्री निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण ९० विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी ७४ सर्वसाधारण, SC-7 आणि ST-9 आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण ८७.०९ लाख मतदार असतील. ज्यामध्ये ४४.४६ लाख पुरुष, ४२.६२ लाख महिला, ३.७१ लाख प्रथमच मतदार आणि २०.७ लाख तरुण मतदार आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या ९० झाली आहे. आता जम्मूमध्ये ४३ आणि काश्मीरमध्ये ४७ जागा असतील. PoK साठी फक्त २४ जागा राखीव आहेत. येथे निवडणूक होऊ शकत नाही. तर लडाखमध्ये विधानसभा नाही. अशा प्रकारे एकूण ११४ जागा असून त्यापैकी ९० जागांवर निवडणूक होणार आहे. जम्मू प्रदेशात सांबा, कठुआ, राजौरी, किश्तवाड, डोडा आणि उधमपूरमध्ये प्रत्येकी एक जागा वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी काश्मीर भागातील कुपवाडा जिल्ह्यात एक जागा वाढवण्यात आली आहे.
हरियाणात दोन कोटींहून अधिक मतदार आहेत. ९० पैकी ७३ जागा सर्वसाधारण आहेत. हरियाणात २७ ऑगस्ट रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. हरियाणात २० हजार २६९ मतदान केंद्रे आहेत.