पुणे – भाजपचे ज्येष्ठ नेेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या तथा पुणे जिल्हा परिषद सदस्य अंकिता यांचा निहार ठाकरे यांच्याशी विवाह झाला आहे. निहार हे उद्धव ठाकरे यांचे पुतणे आहेत. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र बिंदूमाधव ठाकरे यांच्या घरात आता अंकिता आल्या आहेत.
निहार आणि अंकात यांचा विवाह सोहळा आज संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यास हजेरी लावली. निहार हे वकील असून त्यांचे एलएलएम पर्यंत शिक्षण झाले आहे. तर, अंकिता यांनी लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स आणि हार्वर्ड विद्यापीठातही शिक्षण घेतले आहे. यानिमित्ताने पाटील आणि ठाकरे परिवार आता स्नेह बंधनात जुळला आहे.
अंकिता या इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या सदस्या सुद्धा आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विवाहाची चर्चा होत होती. अखेर आज त्यांचा लग्न समारंभ संपन्न झाला आहे. या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका हर्षवर्धन पाटील यांनी प्रत्यक्ष अनेक मान्यवरांना दिली होती. अत्यंत मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
निहार हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. निहार यांचे वडील बिंदूमाधव यांचे १९९६ मध्ये अपघाती निधन झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे बंधू जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चुलत काका आहेत. या विवाहाच्या निमित्ताने ठाकरे आणि पाटील अशी दोन राजकीय घराणी एकत्र आली आहेत.
राज्यात सध्या अनेक राजकीय कुटुंबांमध्ये लग्नसोहळे संपन्न होत आहेत. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या घरात लग्न समारंभ झाला आहे.