इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने धर्म तर बदललाच पण नावही बदलले आहे. भारतातील अंजू पाकिस्तानात जाऊन फातिमा बनली आहे. तिने धर्म परिवर्तन करून इस्लाम धर्म स्वीकारला असून मित्र नसरुल्लाहशी निकाह केला आहे. खरं तर व्हिसा घेऊन अंजू पाकिस्तानात गेली तेव्हा आपण केवळ फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी गेल्याचे तिने सांगितले होते. आणि काही दिवसातच ती भारतात परत येईल. पण, आता तिथे जाऊन अंजूची भाषा बदलल्याचे दिसत असून पाकिस्तानमध्ये जाऊन तिने निकाह केल्याचे वृत्त आले आहे. विशेष म्हणजे, अंजू आधीच विवाहित असून तिला दोन मुलेही आहेत. आणि आता मुसलमान धर्म स्वीकारणाऱ्या अंजूने यापूर्वीच ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
पाक प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आता मुसलमान धर्म स्वीकारल्यानंतर अंजूचे नाव बदलले असून ते फातिमा ठेवले आहे. जिल्हा न्यायालयात तिचा निकाह झाला आणि तिने इस्लाम धर्म स्वीकारला. मालकुंड डिव्हिजनचे डीआयजी नासिर महमूद दस्ती यांनी अंजू आणि नसरुल्लाह यांच्या विवाहाला दुजोरा दिला आहे. दोघांनी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डीआयजी मालकुंद यांच्या न्यायालयात विवाह केला. त्यानंतर अंजूला पोलीस संरक्षणात घरी पोहोचवण्यात आले.
लग्न झाल्यानंतर केला व्हिडीओ शेअर
निकाह झाल्यानंतर दोघांनी ‘अंजू वेड्स नसरुल्ला’ नावाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ते दोघेही एका डोंगरावर आहेत. दोघांनी वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केले. त्यामध्ये तिने पाकिस्तानमध्ये सुरक्षित वाटत असल्याचे म्हटले आहे. अंजूला पाकिस्तानात धोका होऊ शकतो, हे लक्षात घेऊन पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. वास्तविक, नसरुल्लाने सोमवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, अंजू केवळ पाकिस्तान फिरायला आली आहे. त्यांच्यात केवळ मैत्री आहे. दोघांचा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. असे सांगणाऱ्या नसरुल्लाने अंजूशी निकाह केल्याचे समोर आले आहे. नसरुल्लाने म्हटले की, अंजूकडे २० ऑगस्टपर्यंत व्हिसा आहे. त्यानंतर ती भारतात परत जाईल.
विवाह केल्याच्या वृत्तास नकार
निकाह केल्यानंतर माध्यमांनी नसरुल्लाशी संवाद साधला. तेव्हा, त्याने विवाह केल्याचे नाकारले. त्याने म्हटले की, अंजू (फातिमा) त्यांची चांगली मैत्रीण आहे. आमचे एकमेकांवर प्रेम नाही. असे असले तरी दोघांचा निकाहनामा समोर आल्यानंतर नसरुल्लाहाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रतिज्ञापत्रात काय?
मीडियामध्ये व्हायरल प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की, ‘नाव – फातिमा, वडील- प्रसाद, पत्ता- अलवर, राजस्थान, भारत. मी प्रतिज्ञापत्रावर घोषित करते की, माझे पूर्वीचे नाव अंजू होते आणि मी ख्रिश्चन धर्माची होते. मी माझ्या स्वखुशीने, कोणत्याही दबावाशिवाय इस्लामचा स्वीकार केला आहे. मला यासाठी कोणीही जबरदस्ती नव्हती. मी, नसरुल्ला, वडील गुल मौला खान, पत्ता- दिर, खैबर पख्तुनख्वा, याच्यावर प्रेम करते आणि त्याच्यासाठी माझ्या देशातून पाकिस्तानात आले आहे.’ ‘मी माझ्या इच्छेने नसरुल्लाशी साक्षीदारांसमोर शरियत-ए-मोहम्मदीनुसार १० तोळे सोन्याच्या हुंडा देऊन लग्न करत आहे. शरियत कायद्यानुसार, नसरुल्ला माझे पती आहेत. मी नसरुल्लाहशी माझ्या इच्छेनुसार लग्न केले आहे. हे माझे विधान सत्य आणि बरोबर आहे. मी यात काहीही लपवले नाही.’