इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद गेल्यानंतरही त्यांनी बंगला तब्बल ५ महिने खाली केला नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत त्यांच्यावर टीका केली आहे.
दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद सोडलं, पण पुन्हा मंत्री म्हणून येण्याची हाव सुटत नाही. ४ मार्चला त्यांच्याकडून पदाचा राजीनामा घेतला गेला, आज ४ ऑगस्ट आहे. तब्बल ५ महिने उलटून गेले. ह्या आधी ऑफिसच्या बाहेरची पाटी काढली नाही. ते प्रकरण लावून धरलं म्हणून पाटी काढली, आणि आता हे.
आता शासकिय बंगला तब्बल ५ महिने खाली केला नाही. त्यांचं म्हणणं असे आहे की …आजारपणामुळे आणि मुलीच्या शाळेमुळे मुंबईत रहावं लागत आहे. जरूर रहा, पण माझ्या आणि सामान्य लोकांच्या कराच्या पैशांनी नाही. तो बंगाला हा शासकीय कामासाठी दिला जातो.
जर तुम्ही स्वाभिमानी असतात तर फुकटचं घर घेऊन राहिला नसतात. एक २BHK विकत नाहीतर भाड्यावर घेऊन राहिला असतात. खोटी कारणं दिली नसती. खरंतर हा बंगला ४६६७ चौ फुटाचा बंगला आहे, म्हणजे याच्या दंडाची रक्कम ही महिन्याला २०० रुपये चौ फुटाप्रमाणे, तब्बल पाच महिन्याची म्हणून ४६ लाख रुपये इतकी आज रोजी आहे. ह्या दंडाचा पैसांपैसा वसूल केला गेला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना हा दंड माफ करण्याचे अधिकार असतात, पण त्यांनी १ रुपया देखील करता कामा नये.