मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
सदस्य चेतन तुपे यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘एसआयटी’ची स्थापन करून या प्रकरणाची कालबद्ध चौकशी करण्यात येईल. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून दोषींना पाठीशी घालणाऱ्या सर्वांवरही कठोर कारवाई करण्यात येईल असे म्हटले.
त्यानंतर आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, इतकी मित्रता? मुंडेंनी मागितली आणि एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी SIT जाहीर केली? आज दुपारी २ वाजता मी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची भेट, विधान भवनात येऊन घेणार आहे.
काल धनंजय मुंडेंना बीडच्या अल्पवयीन मुलीवर भाष्य करताना बघून खूप राग आला. जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, त्याचे म्हणणे मुख्यमंत्री एका दिवसात ऐकून एका महिला आयपीएस ची SIT लावतात? बीडच्या त्या अल्पवयीन मुलीला तातडीने न्याय मिळालाच पाहिजे, पण त्यासाठी लढायला चांगली सुसंस्कृत माणस आहेत. आम्ही नेहमी प्रमाणे लढूच. ह्यावर बोलण्याचा हक्क धनंजय मुंडेंना नक्कीच नाही.
वैष्णवीच्या केस मध्ये मी तिच्या आईवडिलांना घेऊन वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा एक महिन्याने फ़ास्ट ट्रैक वर केस केली. ही केस मुख्यमंत्र्यांनी का तत्काळ फ़ास्ट ट्रॅकवर केली नाही?
सगळ्या महिला आमदारांनी ह्याचा विरोध करायला हवा. महिलांच्या सगळ्या प्रश्नांची दाखल ही तत्काळ घेतली गेली पाहिजे, पण ती मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून घ्यावी. धनंजय मुंडेंना यावर बोलण्याचा हक्क नाही.