नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मखमलाबादच्या शांतीनगर येथे एका सोसायटीत रात्रीच्या वेळी बंद दरवाजासमोर भानामती,करणी असे अंधश्रद्धा युक्त प्रकार करून रहिवाशांमध्ये भीती पसरविण्याच्या हेतूने स्मशानभूमीतून अस्थी व राख आणून टाकल्याचा प्रकार घडला. घरमालकाने याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराने यांना तत्काळ संपर्क साधून माहिती दिली. कार्यकर्त्यांनी तत्काळ पोलिसांसह घटनास्थळाला भेट दिली आणि प्रबोधन केले. रहिवाशांच्या मनामध्ये अंधश्रद्धेतून निर्माण झालेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.
मखमलाबाद रोडवरील शांतीनगर येथील वैजयंती अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर दरवाजाबाहेर रात्रीच्यावेळी भानामती,करणी करण्याचा बहाणा करून, भीती पसरविण्याच्या खोडसाळपणा अज्ञात व्यक्तीने केल्याचे दिसून आले. स्मशानभूमीतून राख व अस्थी आणून रात्रीच्या वेळी बंद दरवाजापुढे ह्या अज्ञात व्यक्तीने पसरविल्याचे सकाळी घरमालक महिलेला दिसून आले.
त्यांनी सदर अंधश्रद्धा युक्त प्रकारची माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांना तत्काळ कळविली. डॉ गोराणे यांनी तत्काळ शहर कार्याध्यक्ष कोमल वर्दे यांच्या मार्फत म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीसनिरीक्षक अंकुश चिंतामणी व पोलीस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर यांना या बाबत संपर्क साधला. त्यांनी पोलिस हवालदार संतोष सुपेकर, विनायक तांदळे यांना अंनिसच्या कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी पाठवले.
या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला रात्री कुलूप लावलेले असतानाही हा प्रकार घडला. म्हणजे इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीनेच हा प्रकार केला असल्याचे तेथील रहिवाशांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले. या अगोदरही दोन-तीन वेळा बंद दरवाजा पुढे लिंबू ,हळदीकुंकू फेकल्याचेही आढळून आल्याचे काही रहिवाशांनी सांगितले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. ठकसेन गोराणे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, जिल्हा बुवाबाजी विरोधी संघर्ष सचिव महेंद्र दातरंगे, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्त्री, शहर कार्याध्यक्ष कोमल वर्दे,त्रिवेणी पिंगळे, आशुतोष पिंगळे आदींनी स्थानिक रहिवाशांचे प्रबोधन केले.
विशेष म्हणजे अंनिसच्या प्रबोधनानंतर घरमालक महिलेने स्वतः पुढाकार घेऊन दारापुढील अस्थी व राख स्वतः जमा करून एका पिशवीत भरली. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विचार व कार्यपद्धतीची थोडक्यात माहिती प्रल्हाद मिस्त्री यांनी उपस्थित रहिवाशांना दिली. जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती देत, कोणी व्यक्ती जर जादूटोणा करण्याच्या नावाखाली लोकांमध्ये दहशत, भीती आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करीत असेल, विविध प्रकारे शोषण करीत असेल तर गुन्हा सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीला सहा महिने ते सात वर्षांची कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये ते पन्नास हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद कायद्यात असल्याचे डॉ. गोराणे यांनी सांगितले.
जर कोणी अंधश्रद्धा व दैवी तोडगे करताना आढळून आले तर रहिवाशांनी न घाबरता तत्काळ पोलिसांकडे तक्रार करावी, तसेच इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, अशा सूचना पोलीस हवालदार संतोष सुपेकर व विनायक तांदळे यांनी दिल्या.