तिसऱ्यांदा संधी द्या,विश्वासाला तडा जाऊ देणार नाही!
सुदर्शन सारडा
निफाड:प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीत निफाड तालुका हा विचारांवर निष्ठा ठेवणारा तालुका म्हणून ओळखला जातो.तीनपैकी दोनवेळा मतदारांनी संधी दिली. त्यामुळे हजारो कोटींची कामं मी मतदारसंघात आणू शकलो. निफाड तालुक्यातील मतदार हा स्वाभिमानी अन् वैचारिक प्रगल्भ असल्याने यंदा निफाडवर निष्ठेचा भगवा फडकणारच असा ठाम विश्वास महविकास आघाडीचे उमेदवार अनिल साहेबराव कदम यांनी व्यक्त केला.
इंडिया दर्पण ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांना स्पर्श करत आपली भूमिका विषद केली.पुढे बोलताना कदम यांनी निफाड हा ग्रीन बेल्ट असल्याने तो राज्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो. परंतु गेल्या पाच वर्षात नवीन उद्योग असतील, एमआयडीसी असेल शेतीतील नवनवीन आधुनिकता, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेलेले नाही. ते करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. यंदाच्या जाहीरनाम्यात ज्या काही योजना महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात विषद केल्या त्याने प्रत्येक घटक हा समृद्ध होणार आहे. मला अनेक क्षेत्रात निफाड हा एका वेगळ्या उंचीवर न्यायचा आहे. जगाच्या पाठीवर नेमकी काय आधुनिकता येऊ पाहतेय त्याचा पहिल्या टप्प्यात माझ्या निफाडला कसा फायदा होईल याकडे विशेष लक्ष देणार आहे. याच तालुक्याने माझ्यावर दोन वेळा विश्वास दाखवला. मागील निवडणुकीत जे झालं त्यावर मंथन करण्यापेक्षा पराभवाने खचून न जाता त्याच उमेदीने सर्व घटकांना न्याय देण्याचे काम अविरत चालूच ठेवले. जनता जनार्दन माय बाप असताना त्यांच्या कौलाचा स्वीकार करणे माझे परमकर्तव्य असल्याचे सांगत कदम यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत आणलेली विकासाची गंगा यापुढेही सुरूच राहील असा शब्दच देऊन टाकला.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी कदम यांनी पायी काढलेली बळीराजा संघर्ष यात्रा येणाऱ्या काळात निश्चितपणे शेतकऱ्यांना संघर्षातून मुक्त करून त्यांच्या आयुष्यात नवी समृद्धी घेऊन येणार यात तिळमात्र शंका नाही. सहकार धोरणाबाबत बोलताना कदम यांनी सहकार अन् निफाड ही पूर्वापारची ओळख पुन्हा मिळवून देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. निफाड हा विचारांवर चालणारा तालुका असल्याने येथे निष्ठा,विचार आणि प्रगल्बता हेच तीन पैलू पाहिले जातात हा आजपर्यंतचा इतिहास आहे.जनतेने ही निवडणूक हातात घेतली असून तालुक्यात प्रत्येक गाव,शहरात मिळणारा प्रतिसाद अन् माझ्यावर दाखवत असलेल्या प्रेमाला मी कदापिही तडा जाऊ देणार नाही असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.जे जे प्रश्न तालुक्यात प्रलंबित आहे त्याबाबत भविष्याचा अचूक वेध घेत ते शंभर टक्के सोडवले जातील असा शब्द कदम यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
शेती अन् रोजगार या धोरणांवर बोलताना त्यांनी विविध विषयांवर अभ्यासू पद्धतीने उत्तर दिले.मतदारांचे प्रेम अन् पाठिंब्याच्या जोरावर येत्या वीस नोव्हेंबर रोजी सुज्ञ असलेला निफाड त्यांच्या हक्काचे,सर्वसामान्य लोकप्रतिनिधी म्हणून तिसऱ्यांदा विधी मंडळात पाठवतील यावर ठाम विश्वास व्यक्त केला.